एकटा जीव... आणि कोविड-19

Share

एका रात्रीत सगळं बदललं. इतकं की, अजूनदेखील पचवायला अवघड जातंय. आपलं ‘रूटीन’- मग ती रोजची कामे असोत, समाजात वावरणे असो, शाळा-कॉलेजात जाणे असो, शॉपिंग किंवा नुसतेच भटकणे असो, जी कामे आपण गृहीत धरून करायचो, ज्यांच्यावर बंधने येतील असे वाटणे देखील ‘पाप’ वाटले असते – ती आपल्या जगण्याचा भागच राहिली नाहीत, आणि अचानक आपल्याला परीकथेतल्या वाईट जगात अडकल्यासारखे झाले आहे. 

 

अशावेळी आपल्या ‘जगण्यावर’ आपलं नियंत्रण नाही, ही गोष्टच भेदरवून टाकणारी असते. घरी थांबण्यावाचून पर्याय नसतो, आणि स्वातंत्र्यावर आलेली ही गदा कोणासाठी घाबरवणारी असते, तर कोणासाठी उकसवणारी!

 

त्यातही ‘टाळेबंदी (लॉकडाऊन)’ जेव्हा एकट्याला अनुभवायला लागते तेव्हा ती अधिक आव्हानात्मक ठरते.  कुटुंबामध्ये किमान एकमेकांचा आधार असतो, काही जणांसाठी निदान ‘सोबत’ तरी असते. पण जे कोणी एकटे राहतात, त्यांच्यासाठी ही परिस्थिती कठीण असते. रोजचे उद्योग, मित्रांबरोबर बाहेर जाणे, वेळ घालवणे, आणि ‘शहरी’ जीवनशैली यामुळे एकटेपणा तात्पुरता बाजूला राहायचा, पण टाळेबंदीमुळे नेमके हेच मार्ग बंद होतात. 

 

एक मात्र खरे, की यामुळे आपल्या जगण्याच्या विचारसरणीला एक वेगळे, अनोळखी वळण मिळालेले आहे. अशावेळी, विशेषकरून एकट्या जीवांना प्रश्न सतावतो – या परिस्थितीला सामोरे जायचे कसे?

 

आनंदाची गोष्ट म्हणजे, यातून स्वत:ला सांभाळून नेण्याचे आणि आपले मानसिक स्वास्थ्य टिकवण्याचे मार्ग उपलब्ध आहेत. याच बाबतीत माझे बोलणे मानसिक आघात विशेषज्ञ डॉ. अंजुला माया सिंघ बैस यांच्याशी झाले. त्यांनी अशा लोकांना सक्षम करण्यासाठी काही सल्ले दिलेले आहेत. - “लहान मुले काय करतात हे पाहून बरेच शिकता येऊ शकते. मुले खेळात जुन्या कांबळीचा तंबू बनवतात, खेळण्यांशी मित्राप्रमाणे वागतात, थोडक्यात, त्यांच्याकडील सृजनशीलता व इतरांबद्दलची आपुलकी आपण अंगिकारली तर त्याचा फायदा होऊ शकतो.”

 

तेव्हा मुलांसारखा मोकळेपणा तुमच्या मनात येऊ द्या, एकाच गोष्टीकडे जरा वेगळ्या बाजूने पाहायला शिका. जसे की, आपल्या घरीच असलेल्या वर्तमानपत्रांमधून कागदी थैल्या बनवणे, रिकाम्या दुधाच्या बाटल्यांना रंग देऊन फुलदाण्या करणे, असे उद्योग तुम्ही करू शकता. डॉ. बैस सांगतात, “आपत्तीच्याच काय, इतर वेळीदेखील, स्वत:बरोबरच आपुलकीने वागणे आणि स्वत:ची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते.”

 

तुम्ही एकटे आनंदाने राहात असाल, तर उत्तमच; पण जर एकटेपणा, काळजी, अनिश्चितता आणि भीती तुम्हाला खात असेल, तर पुढील सोपे, साधे आणि सहज करता येतील असे काही उपाय तुम्हाला याकाळात तारून नेऊ शकतात.

 

१. आपला दिनक्रम बनवणे

जेव्हा पुढची दहा मिनिटे देखील कशी घालवायची याची आपल्याला शंका असते, तेव्हा दर दिवसातला एव्हढा रिकामा वेळ दत्त म्हणून उभा राहतो. मग एकतर कोणती ना कोणती काळजी तरी लागून राहते, किंवा एकटेपणा तरी खायला उठतो. इथेच भासते दिनक्रमाची आवश्यकता, आणि तो खरेच काम करून जातो. आपल्या झोपण्याचा व उठण्याचा कार्यक्रम बसवा. टाळेबंदीच्या याकाळात आपली झोप नीट व्हावी याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. 

 

आपली न्याहारी आवडीने करा. त्यात नाविन्य आणा, शक्य असल्यास थोड्या हटके रेसीपी बनवा. जर तुम्हाला वाटत असेल की नाश्त्याला काय इतका मान द्यायचा? तर खरंच सांगते, त्याच्यासारखा मान कोणाचा ठेवू नये! दिवसाची सुरुवात त्यानेच होते. अशावेळी आपला मूड जर तो चांगला करू शकत असेल, तर तो दिवसभर आपल्याला मदत करू शकतो.

 

मग या बाहेर आपल्या झोपाळू कपड्यांतून! मस्त आंघोळ करा आणि कपाटातले झक्क आवडीचे कपडे चढवा अंगावर. तुम्ही म्हणाल- ‘कोणाला दाखवायचय?’, पण तुम्ही स्वत:ला विसरू नका -- आणि आपल्याला एखादा आवडीचा शर्ट वा कुर्ती घातल्यावर किती छान वाटते, हे वेगळं सांगायची गरज आहे का? हे करून पहा, आणि आपल्यात झालेला बदल अनुभवा. मग भले आपल्याला ते कितीही वेडेपणाचं वाटो. शेवटी तुमचा विचार आणि मनाचा आनंद तुमच्या कृतींवर अवलंबून असतो.

 

आता असाच पुढचा दिवस नियोजित करा. तुम्ही विद्यार्थी असाल, वा नोकरी करत असाल, तर नक्कीच तुम्हाला घरून काम करण्यास सांगितलेले असेल. तेव्हा हे वेळापत्रक देखील दिवसाच्या आराखड्यात सामावून घ्या. मध्यान्हीला किंवा दुपारी ब्रेक घ्या, जेवण बनवा, आणि इथे प्रयोगांची गरज नाही. साधा वरण-भात देखील तृप्त करू शकतो -- जर तुम्ही त्यासाठी बैठक घेतली, बसायला चटई अंथरली, आपल्या आवडीची चायना प्लेट घेतली तर! लहान गोष्टी आहेत; पण काम करून जातील.
 

आणि जर तुम्हाला बाहेरची कामे नसतील तर आजूबाजूला पाहा. तुमच्या मोठ्या फावल्या वेळेला पुरून उरतील अशी कामे बाजूलाच पडलेली आहेत. मुद्दा तुम्हाला स्वत:ला कुठेतरी गुंतवून ठेवण्याचा तर आहे ना! मग ती धुणी-भांडी असतील, पुसा-पुशी असेल, नाहीतर इतर काहीपण -- जे इतर वेळी आपल्या नजरेला पडत नाही, कारण त्यासाठी इतर वेळी घरी कामवाल्या मावशी येत असतील. घरची कामे एक प्रकारे समाधान देऊन जातात. त्यात तुमचे पूर्ण लक्ष द्यायला लागते, हातापायांना काम मिळते (तुमचा रोजचा व्यायाम कदाचित या दिवसांत सुटला असेल), आणि तुमचे घर देखील चकचकीत होते.

 

संध्याकाळी स्वत:साठी फक्कडसा चहा होऊन जाऊ द्या, दोन-तीन बिस्किटे घ्या त्याबरोबर बुडवायला! घराला गच्ची असेल तर तिथे बसून पक्ष्यांचे आवाज ऐकण्यात वेगळाच आनंद असतो. तसेच यावेळी तुम्ही घरच्यांबरोबर फोनवर गप्पा मारू शकता, मित्रमैत्रिणींना ऑनलाईन भेटू शकता, आपल्या मोबाईलवर सुमधुर गाणी ऐकू शकता, किंवा टीव्हीचा देखील आनंद घेऊ शकता.

 

आणि मग आपली आवडीची किमान८ तासाची झोप घ्यायला विसरू नका.

 

डॉ. बैस म्हणतात, “विलगीकरण ही शिक्षा न मानता स्वत:ला शोधायची संधी मानली, तर आपल्या दृष्टीकोनात कमालीचा फरक जाणवून येतो. केवळ टाळेबंदी नाही, इतर वेळीसुद्धा ज्या गोष्टी आपल्याला अशांत, अस्वस्थ करतात, त्या आपल्या शत्रू नसून इशारा देणाऱ्या सोबती असतात, ज्या तुम्हाला पाणी मुरतंय कुठे, ते दाखवायला मदत करतात. तुम्ही स्वत:ला विचारा की, आपल्याला एकटं का वाटतंय? कारण प्रत्येक भावनेमागे विचार असतो, आणि जेव्हा त्या विचाराची कडी सापडते, तेव्हा तिचा वापर करून तुम्ही तुमच्या विचारांची दिशा बदलू शकता. दैनंदिन व्यवहारातून अशा प्रकारे घेतले जाणारे ब्रेक्स तुम्हाला आंतरिक समाधानाकडे नेऊन जायला पुरेसे ठरतात.”

 

२. नवीन काहीतरी शिकून घ्या

तुम्हाला नवीन रेसीपी शिकायची होती ना? आणि त्या ऑनलाईन क्लासचे काय झाले? वेळ नव्हता मिळत? मग आताच शिकून घ्या! इंटरनेट हे असे माध्यम आहे, जिथे जर नेमके काय शिकायचंय हे तुम्हाला माहीत असेल, तर त्याबाबतीत तिथे काहीना काही नक्कीच मिळून जाते.

 

३. संपर्कात राहा

विलगीकरणामध्ये उदासीनता सहज येते, आणि अशावेळी तुम्हाला दिवसभर झोपून काढावासा वाटणे साहजिकच असते. त्याऐवजी जर दररोज आपल्या ओळखीच्या, जवळच्या, घरच्या लोकांना एक ते दोन फोन वा व्हिडीओ कॉल केले, तर त्यांचे चेहरे पाहून आणि त्यांचा आवाज ऐकून एकटेपणाचा ताण बऱ्यापैकी कमी होतो. भलेही तुम्ही एकटे असाल; पण किमान समोर कोणीतरी असते!

 

४. व्यायाम करा

ढिसाळ अंग म्हणजे तुमच्या मन:स्थितीला आव्हान! याचा सामना करण्यासाठी तुमच्या क्षमतेप्रमाणे जमतील तसे व्यायाम करा. मग ते योग-प्राणायामापासून छाती भात्यासारखी फुलून येईपर्यंत कुठलेही असोत, ज्यांची माहिती मिळवणे आजच्या टेक्नोयुगात कठीण नाही. अवघड असेल तर घरगुती कामे आहेतच! तीपण पुरेशी आहेत.

 

५. ध्यान आणि मन:शांती

तुम्ही रोज ध्यान लावत असाल तर ते चालू ठेवा. हवे तर दिवसातून दोन वेळा करा. त्याने तुमच्या मनाची एकाग्रता आणि स्थिरता टिकून राहील. तसेच याचे दूरगामी परिणाम तुम्हाला दिसून येतील. या आधी कधीच ध्यान केलेले नसेल तर तुम्हाला मदत करण्यास नेटवर अनेकविध ॲप्स उपलब्ध आहेत. तुम्ही पुढील संकेतस्थळाला भेट देऊ शकता, ज्यावर विनामूल्य उपलब्ध असणारे असे १० ॲप्स तुम्हाला मिळून जातील.

https://www.creativeboom.com/resources/10-calming-apps-to-help-you-beat-stress-and-feel-more-relaxed/

 

प्राणायामासारखे श्वासोच्छ्‌वासाचे व्यायाम करणे हा तुमचे डिप्रेशन, चिंता दूर करण्यासाठीचा सहजसुलभ मार्ग आहे. सर्वांत सोपे म्हणजे, जेथे तुम्हाला शांतपणे बसता येईल तेथे बसा, डोळे मिटा, आणि तुमच्या श्वासोच्छ्‌वासावर लक्ष केंद्रित करा. बस्स! यासारखे अनेक प्रकार तुम्हाला नेटवर मिळून जातील, आणि ते तुम्ही जितका वेळ करू इच्छिता, तितका वेळ करा. कारण ते करणे महत्वाचे आहे. काही काळाने त्याचा तुमच्या मूडवर झालेला बदल तुम्हाला दिसून येईल. 

 

६. ऑनलाईन उपचारपद्धती 

या काळात तुम्हाला कोणाच्या मदतीची गरज भासली, तर अनेक मार्गदर्शक, तज्ज्ञ, सल्लागार आणि मानसिक आरोग्यावर काम करणाऱ्या संस्था आहेत ज्या तुम्हाला ऑनलाईन मार्गदर्शन करण्यास तत्पर असतात. विशेषत: या दिवसांत काही मंडळी तुमची मोफत सत्रे घेण्यासही तयार आहेत. मानसोपचारतज्ज्ञांशी संवाद साधण्याने आपल्याला स्वत:मध्ये बराच बदल जाणवतो, त्यामुळे त्यांच्याकडे मदतीचा हात मागणे कमीपणाचे नाही, हेही आपण जाणून घ्या.

 

७. संगीत

स्वयंपाक, साफसफाई, किंवा नेहमीची इतर कोणतीही कामे करताना तुम्ही संगीताचा आस्वाद घेऊ शकता. यात रेडिओवरील श्रुतिका, सांगीतिक व्यासपीठावरील (podcasts) प्रवचने, प्रहसने, कथा यांची यादीदेखील समाविष्ट होते. थोडक्यात, इतरांच्या आवाजातील कार्यक्रमदेखील तुमचे मन हलके करू शकतात. तसेच इंटरनेटवर असे मोफत व्हिडीओ सुद्धा आहेत जेथे लोक मानसिक आरोग्यासंदर्भात माहिती देतात. ASMR (Autonomous Sensory Meridian Response) नावाच्या श्रुतिका इंटरनेटवर उपलब्ध आहेत – त्या तुमच्या ज्ञानेंद्रियांना विविध नैसर्गिक आवाजांच्या (पाऊस, वनामधील पानांची सळसळ, समुद्राच्या लाटा, इ.) माध्यमातून आराम देतात.

 

८. इतरांना मदत करा

ज्यांची परिस्थिती चांगली नाही असे आपल्यासारखेच इतर लोक आहेत. हीच वेळ आहे त्यांच्यापर्यंत पोहोचायची आणि आपसूकच स्वत:पर्यंत पोहोचायचीसुद्धा.

 

काही वर्षांपूर्वी रिल्क नावाच्या कवीने लिहिलेल्या ओळी माझ्या वाचनात आल्या होत्या, ज्या मी कधी विसरले नाही.

“Perhaps all the dragons in our lives are princesses who are only waiting to see us act, just once, with beauty and courage. Perhaps everything that frightens us is, in its deepest essence, something helpless that wants our love.”

 

काहीवेळा खायला उठणारा, अंगावर येणारा एकटेपणा हाच स्वत:शी मैत्री करण्याचा मार्गही दाखवतो. कदाचित तुम्हाला तो भेटेलही; पण तोच तुम्हाला ‘खुद के दम पर’ यातून बाहेर काढण्याची, आत्मिक स्वातंत्र्याच्या पैलतीराला पोहोचविण्याची व्यवस्था करेल. तुमच्याकडे असलेल्या, लपलेल्या कलागुणांना वाव देईल.

 

ज्यावेळी मन म्हणेल, “मला टाळेबंदीचे हे दोन आठवडे जमणारच नाहीत, हे माझ्याने होणार नाही,” त्या त्या वेळी त्याला सांगा- “मला जमू शकते आणि जमवून दाखवीनच, मी ठीक आहे आणि ठीक राहीनच.”

केवळ एका दिवसाचा -- नव्हे, येणाऱ्या पुढच्या तासाचा -- विचार करा, आणि मुख्य म्हणजे स्वत:शी आत्मीयता ठेवा, स्वत:ची काळजी घ्या.

 

या विलगीकरणात तुम्ही जरी तुमच्या घरी, खोलीवर अथवा फ्लॅटवर एकटे असाल, तरी आपण सर्वच जण याप्रसंगी एकत्र आहोत, मुळात आपण सगळेच या परिस्थितीत अडकलेलो आहोत. तेव्हा हेही दिवस जातील आणि यातून आपण सहीसलामत बाहेर येणार येऊ, हे विसरू नका.

 

गरज आहे ती फक्त दृष्टीकोन बदलण्याची!

 

रुक्मिणी चावला कुमार या ‘पेंग्विन इंडिया’च्या संपादकीय सल्लागार असून, मानसिक आरोग्याशी संलग्न अशा शारीरिक - मानसिक - आध्यात्मिक साहित्यावर त्यांचा भर आहे. त्यांचा ई-मेल पत्ता आहे - rukichawla@hotmail.com