कोरोनाविषाणू रोग (कोविड-19): वारंवार विचारले जाणारे प्रश्न

Share

सध्या जगात उद्भवलेल्या कोरोनाविषाणूच्या साथीच्या काळात कोरोनाविषाणूचे संक्रामण आणि कोविड-19 रोग यांबाबत चुकीची माहिती आणि अफवा यांचा ओघ, खासकरून समाज माध्यमांवर, वेगाने वाढला आहे. अशा परिस्थितीत या विषाणूसंबंधी विचारण्यात आलेल्या काही प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आणि गैरसमजुती दूर करण्यासाठी आम्ही इन्स्ट‍िट्यूट ऑफ मॅथेमॅटिकल सायन्सेस (चेन्नई) आणि अशोका युनिव्हर्सिटी (सोनीपत) येथील भौतिकी आणि जीवविज्ञान विषयांचे प्राध्यापक गौतम मेनन यांना सुचविले.

 (सर्वप्रथम “इंडिया बायोसायन्स” संकेतस्थळावर प्रकाशित)

1. कोविड-19 काय आहे? लोकांना त्याविषयी का भीती वाटत आहे?

कोविड-19 हा कोरोनाविषाणूंच्या संक्रामणामुळे होणारा एक संसर्गजन्य रोग आहे. ज्या विषाणूपासून हा रोग उद्भवतो तो कोरोनाविषाणूचा एक प्रकार आहे. या विषाणूवर खिळ्यांसारख्या असलेल्या संरचनेमुळे हे विषाणू मुकुटासारखे दिसतात. लॅटिन भाषेत ‘कोरोना’ याचा अर्थ मुकूट असा होतो. म्हणून या विषाणूंना ‘कोरोनाविषाणू’ असे नाव पडले आहे.

अनेक वेगवेगळ्या विषाणूंमुळे मनुष्यात रोग उद्भवतात. या रोगांमध्ये पोलिओ, गोवर, एन्फ्ल्युएंझा (ज्याला सामान्य भाषेत ‘फ्ल्यू’ म्हणतात) आणि सर्दी यांचा समावेश होतो. यांपैकी काही रोगांवर रोगप्रतिबंधक लसी उपलब्ध आहेत. यांपैकी काही लसी (सर्वच नाहीत), तुमच्या लहान वयात लसीकरणाच्या वेळापत्रकानुसार इंजेक्शनच्या स्वरूपात तुम्हाला टोचल्या असतील. फ्ल्यू रोगावरदेखील लस उपलब्ध आहे, तुम्ही ती लस घ्यायची किंवा नाही ते ठरवू शकता. परंतु फ्ल्यूपासून संरक्षण मिळण्यासाठी ही लस दरवर्षी घ्यावी लागते. लसीकरणाचा फायदा असा असतो की जेव्हा विषाणू आपल्या शरीरात शिरतात तेव्हा आपली प्रतिक्षम संस्था (सामान्य भाषेत तिला रोगप्रतिकारशक्ती असेही म्हणतात) या विषाणूंना ओळखते आणि त्यांच्याशी लढाई करते.

जेव्हा आपल्या शरीरात एकदम नवीन, शरीराला अपरिचित असे विषाणू शिरतात, तेव्हा समस्या उद्भवते. सर्वसाधारणपणे काही प्राण्यांच्या शरीरात, उदाहरणार्थ डुकरे, कोंबड्या आणि वटवाघळे यांच्या शरीरात, असणाऱ्या विषाणूंच्या बाबतीत हे घडते. प्रसंगी, हे विषाणू मनुष्याच्या शरीरात प्रवेश करू शकतात आणि नवीन, अपरिचित रोगाचा प्रादुर्भाव करतात. कोविड-19 हा असाच एक रोग आहे. याचा विषाणू वटवाघळांपासून उद्भवला असावा, असे मानले जात आहे.

सर्व लोक अनेक कारणांमुळे कोविड-19 रोगाबद्दल चिंतित आहेत. एक म्हणजे, कोविड-19 हा श्वसन संस्थेचा रोग असून त्याचा प्रसार एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये सहजरीत्या होतो. दोन, या रोगाने बाधित झालेल्या रुग्णांपैकी काही मोजक्या लोकांसाठी हा रोग जीवघेणा ठरत आहे. तीन, या रोगाच्या विरुद्ध आपल्या शरीरात नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती विकसित झालेली नाही, या रोगावर कोणतीही रोगप्रतिबंधक लस नाही आणि सद्यस्थ‍ितीत, या रोगावर उपचार करता येतील अशी कोणतीही औषधे उपलब्ध नाहीत.

 

2.      या रोगाचा रुग्णांवर काय परिणाम होतो आणि याचा प्रसार कसा होतो ? 

अनेक रुग्णांमध्ये या रोगाची फ्ल्यूसारखी सौम्य लक्षणे दिसून येतात. बहुधा यात उच्च ताप, कोरडा खोकला आणि थकवा अशी लक्षणे दिसून येतात. काही बाबतीत अंगदुखी, श्वास घेण्यास अडथळा, स्नायूदुखी आणि सांधेदुखी, दुखरा घसा, डोकेदुखी, थंडी वाजून येणे आणि प्रसंगी जुलाब इत्यादी लक्षणे आढळतात. हा रोग तरुणांपेक्षा वृद्धांना होण्याची शक्यता जास्त असते. ० ते ९ वय असलेल्या बालकांना या रोगाची लागण कमी होताना दिसते. ज्या व्यक्तींमध्ये मधुमेह, हृदयविकार, फुफ्फुसाचे विकार (श्वसन संस्थेचे विकार) आहेत किंवा ज्यांची प्रतिकारशक्ती दुबळी आहे, अशा व्यक्तींना कोविड-19 रोगापासून मोठा धोका संभवतो. सामान्यपणे ५ रुग्णांपैकी  एकामध्ये या रोगाचे गंभीर परिणाम दिसून येतात; यात न्युमोनियासारख्या आजाराचा समावेश आहे.

कोरोनाविषाणू-बाधित व्यक्तीच्या खोकल्यातून किंवा शिंकेतून बाहेर पडलेल्या तुषारांमधून या विषाणूंचा म्हणजेच रोगाचा प्रसार होतो. हे तुषार पृष्ठभागावर पडून राहू शकतात, आणि अशा पृष्ठभागाला तुमचा स्पर्श झाल्यास, आणि नंतर तुम्ही हातांचा स्पर्श तोंडाला किंवा चेहऱ्याला केल्यास, हे विषाणू तुमच्या फुफ्फुसात जाऊ शकतात.

 

3.       मला आणि इतरांना या रोगापासून बचाव करण्याचा काही मार्ग आहे का?

होय, नक्कीच आहे! या विषाणूचा संचार श्वसन मार्गावाटे होतो, म्हणजेच बाधित व्यक्तीच्या खोकल्यातून किंवा शिंकण्यातून बाहेर पडलेल्या लहान तुषारांमधून होतो. हे तुषार कोणाच्या तरी तळहातावर किंवा दरवाजाच्या मुठीवर किंवा कठड्यासारख्या पृष्ठभागावर, थोडक्यात ज्या वस्तूंना लोक सहज स्पर्श करतात, तेथे असू शकतात. तेथून या तुषारांमधून हे विषाणू तुमच्या तोंडात आणि फुफ्फुसात जाऊ शकतात. यावर उपाय काय? विषाणूंचा संचार रोखण्यासाठी तुमचे हात काळजीपूर्वक धुवा. डॉक्टर आणि परिचारिका त्यांचे हात कसे धुतात, हे तंत्र दाखविणारे उत्कृष्ठ व्हिडीओ युट्यूब चॅनेलवर उपलब्ध आहेत, ते पहा. महत्त्वाचे म्हणजे, तुम्ही स्पर्श केलेल्या नळाचा भाग तुमचे हात धुण्याआधी साबण आणि पाण्याने धुऊन टाका. अशा प्रकारे, नळ तुम्हाला हवे तेव्हा उघडता येईल आणि बंद करता येईल आणि पाण्याची बचत होईल. 

जर तुमच्याजवळ साबण आणि पाणी नसेल, तर तुम्ही अल्कोहॉलयुक्त सॅनिटायझरचा वापर करा. परंतु शक्य होईल तेवढे तुमच्या हातांचा स्पर्श तुमच्या चेहऱ्याला करण्यापासून टाळा.

याशिवाय, गर्दी करणे टाळा कारण तुम्ही बाधित व्यक्तीच्या संपर्कात येण्याची शक्यता वाढते. अशा प्रकारे इतर लोकांपासून शारीरिकदृष्ट्या विलग करण्याच्या पद्धतीला ‘सामाजिक अंतरीकरण (सोशल डिस्टंसिंग)’ म्हणतात. सामान्यपणे तुमचे इतर लोकांपासून ३ ते ६ फुटाचे अंतर ‘सुरक्षित’ समजले जाते. एकमेकांशी हस्तांदोलन करणे टाळा. शारीरिक संपर्क टाळण्यासाठी ‘नमस्ते’ किंवा ‘आदाब’ यांसारख्या भारतीय शुभेच्छांचा वापर करा.

 

4. मी दरवेळी घराबाहेर पडताना तोंडावर रूमाल (मास्क) बांधणे गरजेचे आहे का?

मास्क वापरल्याने, कोविड-19 रुग्णाच्या संपर्कात आल्यास तुम्हाला या रोगापासून बरेचसे संरक्षण मिळते. पण मास्कचा मुख्य फायदा म्हणजे तुम्ही जर बाधित असाल तर तुमच्यापासून इतर लोक सुरक्षित राहू शकतात. सरकारी निर्देशानुसार बहुतेक सार्वजनिक ठिकाणी तोंडावर मास्क बांधणे, किंवा रुमाल / स्वच्छ फडके बांधणे बंधनकारक आहे.

 

5. मला सर्दीची/फ्ल्यूची लक्षणे जाणवल्यास मी काय करावे? यावर मी स्वत: चाचणी करून घेणे आणि/किंवा स्वत: विलगीकरण करून घेणे, गरजेचे आहे का? 

कोविड-19 रोगाची लक्षणे इतर अनेक सामान्य आजारांसारखी (जसे, फ्ल्यू, सर्दी इत्यादी) असल्याने तुम्हाला त्यांपैकी एखाद्या आजाराची लागण झालेली असू शकते. तुम्ही आजारी आहात असे तुम्हाला वाटत असेल, तर सर्वप्रथम (आणि अनेक बाबतीत चांगला उपाय म्हणजे) ‘स्वयं-विलगीकरण’ अंमलात आणा. म्हणजेच, स्वत:च्या घरात रहा किंवा जेथे शक्यतोवर तुमचा संपर्क इतर लोकांबरोबर कमीत कमी येईल अशा जागी रहा. याद्वारे या रोगाचा संसर्ग रोखता येईल. हे जेवढ्या त्वरेने करता येईल, तेवढे करा – हे करीत असताना, तुमच्यात आणि तुमची देखभाल करणाऱ्या व्यक्ती (तुमच्या जवळचे नातेवाईक, मित्रमंडळी) यांच्यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कशाही स्वरूपाचा शारीरिक संपर्क होणार नाही, हे पहा. तुमची देखभाल करणाऱ्या व्यक्तींनी स्वत:लाही या रोगाची लागण होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे.

श्वसन संस्थेच्या आरोग्यासाठी चांगल्या सवयी अंगिकारणे, हे कधीही चांगले. उदाहरणार्थ, खोकताना तोंडासमोर तुमच्या हाताचे कोपर आणा किंवा टिश्यू कागद धरा, ज्याची विल्हेवाट सहज लावता येते. मुख्य म्हणजे तुमचे हात नियमितपणे धुवा आणि तुमच्याजवळील व्यक्तींनाही हात धुण्यासाठी सुचवा, विश्रांती घ्या, द्रवरूप पदार्थांचे सेवन अधिक प्रमाणात करा आणि तुमची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होण्यासाठी फळांचे सेवन करा. तुम्हाला जर श्वास घेण्यास अडथळा जाणवत असेल, तर शासनाने चालू केलेल्या हॉटलाईनवर संपर्क करा आणि त्यांचा सल्ला घ्या. सामान्यपणे, खासकरून तुमची लक्षणे सौम्य असतील तर, डॉक्टरांनी सूचना केल्याशिवाय थेट त्यांना जाऊन भेटू नका. यामागील कारण असे आहे की तुम्ही खरोखरच या रोगाने आजारी असाल, तर रुग्णालयाच्या मार्गात तुमचा इतरांशी संपर्क झाल्यामुळे त्यांना तुमच्यापासून संसर्ग होऊ शकतो.      

     

6. मी असे ऐकले आहे की एखाद्या व्यक्तीला हा आजार आहे असे वाटल्यास त्याला ‘विलगीकरण’ कक्षात ठेवतात? विलगीकरण म्हणजे काय आणि खरोखर ही काळजी करण्यासारखी बाब आहे का? 

कोविड-19 बाधितांवर उपचार करताना विलगीकरण दोन प्रकारे केले जाते: 

एका प्रकारात, तुम्हाला शासनाने व्यवस्था केलेल्या कक्षांमध्ये ठेवले जाते. तुम्ही आणि निरोगी व्यक्ती यांच्यातील संपर्क एकदम कमी करणे, असा यामागील उद्देश असतो. जेथे या रोगाचा प्रसार झालेला आहे अशा प्रदेशातून तुम्ही भारतात आलेले असाल आणि जर या रोगाच्या संसर्गाची लक्षणे तुमच्यात आढळत असतील, तर तुमच्याद्वारे या रोगाचा प्रसार होण्याचा धोका मोठा असतो. म्हणून अशा स्थितीत तुम्हाला इतरांपासून विलग केले जाते. 

किंवा, तुमच्या संपर्कात आलेल्या एखाद्या व्यक्तीची या रोगाची चाचणी नंतर ‘सकारात्मक (पॉझिटिव्ह)’ आली, तर तुम्हाला ‘स्वयं-विलगीकरण’ करण्यासाठी सुचविले जाते. याचा अर्थ, तुम्ही घरातच थांबा किंवा तुम्ही अशा
कोणत्याही दुसऱ्या जागी राहा, जेथे तुमचा आणि इतर लोकांचा संपर्क मर्यादित राहील.

विलगीकरणामुळे तुमचा इतरांबरोबर संपर्क कमीत कमी होतो. या कालावधीत आरोग्य सेवेतील अधिकारी तुमच्या आरोग्याच्या स्थितीवर नजर ठेवतात, आणि विलगीकरण कालावधी संपताना तुमची चाचणी घेतात. ही चाचणी ‘नकारात्मक (निगेटिव्ह)’ आल्यास तुम्हाला विलगीकरण केंद्रातून घरी सोडले जाते. विलगीकरण कालावधी सामान्यपणे दोन आठवड्यांचा असतो.

लोकांनी विलगीकरणाबद्दल मुळीच भीती बाळगू नये. जास्तीत जास्त काय होते, तर रोजच्या जीवनात आपण एकमेकांच्या सामाजिक तसेच शारीरिक संपर्कात येत असतो, त्यांपासून काही काळ आपण बाजूला होतो. इतकेच! परंतु जेथे विलगीकरणाच्या सुविधा व्यवस्थित आहेत, तेथे तुम्ही तुमचे कुटुंब आणि मित्रपरिवार यांच्याबरोबर संपर्क करू शकता, तसेच बाहेरच्या जगात घडणाऱ्या घडामोडींबद्दल माहिती मिळवू शकता. अशा ठिकाणी तुम्हाला पौष्टिक अन्न आणि इतर सुविधा पुरविल्या जातात, जेणेकरून तुमचा मुक्काम सुखकर व्हावा.     

या रोगाच्या प्रगतीचा जसजसा आढावा घेतला जात आहे, त्यानुसार विलगीकरण केंद्राबाबतच्या नियमांचे मूल्यमापन केले जात आहे. कोणाला विलगीकरण केंद्रात ठेवायचे आणि कोणाला ठेवायचे नाही, हे ठरविण्यासाठी शासन पुढच्या काळात अधिक कडक नियम करू शकते.

 

7. मांस खाल्ल्याने किंवा चीनमधून आयात केलेली उत्पादने वापरल्याने, मला हा रोग होऊ शकतो का? 

नाही, मुळीच नाही. सर्वप्रथम आपण हे लक्षात घेऊ की या विषाणूचे माणसामध्ये संक्रामण श्वसन मार्गावाटे होते; तुमच्या संपर्कात येणाऱ्या कोणत्याही इतर प्राण्यांमध्ये या विषाणूंना आश्रय मिळत नाही. त्यामुळे मांस खाणे आणि कोरोनाविषाणूचे संक्रामण होणे, यांत कोणताही संबंध नाही. तसेच असे विषाणू उघड्या पृष्ठभागावर दीर्घकाळ टिकत नाहीत आणि उच्च तापमान त्यांना सहन होत नाही. त्याचबरोबर, चीनमधून भारतात येणाऱ्या मालाला वाहतुकीतच एवढा वेळ लागतो की या कालावधीत तुम्हाला संसर्ग करू शकणारे विषाणू टिकतच नाहीत. म्हणून संसर्गाची  भीती न बाळगता चीनमधील उत्पादने वापरणे सुरक्षित आहे.

 

8. या रोगावर प्रतिबंधक लस आहे का, किंवा मला या रोगाची लागण झाली, तर त्यावर मी कोणते औषध घेऊ शकतो? 

या रोगावर अद्याप कोणतीही लस बनलेली नाही. मात्र जगातील अनेक प्रयोगशाळांमध्ये लस तयार करण्याचे प्रयत्न चालू आहेत. काही ‘उमेदवार लसी’ (ही लस मनुष्यावर यशस्वी झाली की तिला कायदेशीर लस म्हणून मान्यता दिली जाते) विकसित होत आहेत, तसेच इतर रोगांवर उपलब्ध असलेल्या औषधांचा वापर कोविड-19 रुग्णांवर केला जात असून ही औषधे उपयोगी पडतील का, हेही पाहिले जात आहे. एक पूर्णपणे सुरक्षित लस बनवायला वेळ लागतो आणि हा कालावधी एक ते दोन वर्षे इतका असू लागतो.

 

9. मी असे ऐकले आहे की या रोगाचा संसर्ग रोखण्यासाठी वनौषधी अर्क आणि आयुर्वेदिक तसेच होमिओपॅथी औषधांचा वापर करता येतो. हे खरे आहे का? 

आपल्याला पारंपारिक औषधांच्या परिणामांसंबंधी फारच कमी माहिती आहे. मात्र काही लोकांचा त्यांवर खूप विश्वास आहे. या औषधांच्या बाबतीत असे सांगितले जाते की काही वेळा ती उपयोगी ठरली आहेत. आरोग्य हे शरीर आणि मन यांच्या आंतरक्रियेवर अवलंबून असते. जरी एखाद्या औषधाचा चांगला परिणाम होईल असा विश्वास ठेवला – मग वस्तुस्थितीत ते औषध नसले तरीही – असे औषध शरीराला रोगाचा प्रतिकार करायला मदत करते. यालाच ‘समाधानक परिणाम (प्लासीबो इफेक्ट)’ म्हणतात. हा काम करेलच असे सांगता येत नाही.

मात्र आता हे स्पष्ट झालेले आहे की सामाजिक अंतरीकरण, श्वसनाच्या आरोग्यदायी सवयी आणि हात धुणे इत्यादी मार्गांनी कोविड-19 सारखे संसर्गजन्य रोग आणि इतर अनेक आजार रोखता येतात, तसेच त्यांचा प्रसारही रोखता येतो. जोपर्यंत तुमचा आणि इतरांचा रोगापासून बचाव करण्यासाठी तुम्ही प्रस्थापित पद्धतींचा वापर कराल, आणि त्यांच्या बदल्यात इतर कोणत्याही न तपासलेल्या किंवा ऐकीव उपायांचा वापर करणार नाहीत, तोपर्यंत तुम्ही नक्कीच सुरक्षित राहू शकता. मात्र तुमची नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती मजबूत होण्यासाठी ताज्या फळ-भाज्यांचे सेवन करा, जेव्हा शक्य असेल तेव्हा उन्हात रहा, आणि भरपूर पाणी प्या. शक्य झाल्यास ताण कमी करण्याचा प्रयत्न करा. कारण ताण वाढल्यास तुमच्या शरीराची रोगांबरोबर लढण्याची नैसर्गिक ताकद कमी होते.

 

10. कोविड-19 रोगाचा प्रसार आटोक्यात ठेवण्यासाठी शासन कोणते प्रयत्न करीत आहे? 

भारत सरकार हा रोग आटोक्यात ठेवण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) केलेल्या नियमांचे पालन करीत आहे आणि प्रत्येक स्तरावरची सार्वजनिक आरोग्य यंत्रणा त्याच दिशेने काम करीत आहे. भारत सरकारचे आरोग्य मंत्रालय कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या रोज प्रकाशित करीत आहे आणि बाधित रुग्णांचे उपचार आणि विलगीकरण यासंबंधी डॉक्टरांना तसेच रुग्णालयांना सूचना करीत आहे. या रोगाचा प्रसार ज्या देशांत झालेला आहे, त्या देशांतील नागरिकांनी भारतात प्रवेश करू नये म्हणून भारत शासनाने त्यांचा व्हिसा रद्द केलेला आहे. ज्या व्यक्तींवर हा रोग झाल्याचा संशय आहे, त्यांची चाचणी केली जात आहे. अनेक ठिकाणी विलगीकरण कक्ष उभारण्यात आलेले आहेत. खरे तर ज्या कोणालाही आपल्याला या रोगाचा संसर्ग झाल्याचा संशय आहे, त्या प्रत्येकाला मदत करण्यासाठी यंत्रणा राबविण्याची गरज आहे. परंतु हे अद्याप सुरू व्हायचे आहे.

पुढच्या काही दिवसांत काय घडते, त्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत. जर कोरोनाविषाणूचे ‘सामुदायिक संक्रामण (कम्युनिटी ट्रान्समीशन)’ घडून आले तर रुग्णांची संख्या एवढी प्रचंड वाढेल की भारतातील सार्वजनिक आरोग्य यंत्रणेला या रोगाशी झुंजणे कठीण होईल. या कारणांमुळेच सामाजिक अंतरीकरण उपाय चालू ठेवणे, कोरोना रुग्णांचा शोध घेणे, स्वयं-विलगीकरण वापरणे आणि ज्यांच्यात नंतर रोगाची लक्षणे विकसित होऊ शकतात त्यांच्यावर लक्ष ठेवणे या बाबी आताच्या घडीला निर्णायक आहेत.

 

11.  हा रोग अजून किती काळ राहणार आहे, किंवा तो कधी नाहीसा होणार आहे? उष्ण हवामानात या विषाणूचा प्रसार आटोक्यात येतो का? हवामानात थंडावा आला तर हा रोग पुन्हा उद्भवेल का? 

याबाबत आताच अंदाज बांधणे अवघड आहे. काही विषाणूजन्य रोग (उदा., फ्ल्यू) मोठ्या प्रमाणात ऋतुनुसार उद्भवतात, आणि सामान्यपणे त्यांचा प्रसार उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात अधिक होतो. आताच्या घडीला, कोविड-19 याच प्रकारच्या आजारांत मोडतो का, याचा ठाम अंदाज बांधणे कठीण आहे. कदाचित या उन्हाळ्यात त्याचे अस्तित्व पूर्णपणे नष्ट होऊ शकते, किंवा कदाचित या रोगाची पुन्हा दुसरी लाट येऊ शकते. आपल्याकडे यासंदर्भात कोणतीही ठोस माहिती नाही.

 

12. कोरोनाविषाणू संदर्भातील अचूक, वैज्ञानिक आणि अद्ययावत माहिती मला कोठे उपलब्ध होऊ शकते?

जागतिक आरोग्य संघटना (WHO), अमेरिकन सेंटर फॉर डिसीज कंट्रोल ॲन्ड प्रिव्हेन्शन (CDC) आणि युरोपीयन सेंटर फॉर डिसीज कंट्रोल ॲन्ड प्रिव्हेन्शन (CDC) या संस्थांची संकेतस्थळे कोरोनाविषाणू संबंधीच्या माहितीचे अचूक स्रोत आहेत. जगातील प्रमुख वृत्तपत्रांची संकेतस्थळे आणि न्यूयॉर्क टाइम्स, बीबीसी यांसारख्या वृत्तवाहिन्या विश्वसनीय माहिती प्रसारित करीत आहेत. भारतातील काही वृत्तपत्रांद्वारे तसेच वृत्तवाहिन्यांवरून कोरोनाविषाणूसंबंधी अचूक आणि संशोधित बातम्या दिल्या जात आहेत आणि त्या खात्रीलायक आहेत. एक महत्वाचा सल्ला म्हणजे नेहमी मूळ स्रोताकडून माहिती मिळवायचा प्रयत्न करा. आताच्या परिस्थितीत, जागतिक आरोग्य संघटना किंवा भारत सरकारचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, जे तत्कालीन सल्लागाराची भूमिका बजावत आहे, दोन्ही अचूक, वैज्ञानिक आणि अद्ययावत माहितीचे स्रोत आहेत.

 

13. वैयक्तिकरित्या, मी स्वत:ची काळजी कशी घेऊ? 

जर तुमचे वय ६० वर्षांपेक्षा कमी असेल आणि तुम्हाला मधुमेह, हृदयविकार, श्वसन संस्थेचे विकार नसतील, तर कोविड-19 रोगाचा संसर्ग झालेला तुम्हाला कदाचित जाणवणार नाही. मात्र तुमचे वय ६० वर्षांपेक्षा अधिक असेल किंवा एखाद्या आजारामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असेल, तर सद्याच्या स्थितीत तुम्ही इतरांबरोबर, प्रसंगी कुटुंबातील सदस्यांबरोबर, जवळचा संपर्क कमी करा आणि तुमच्या तब्येतीची काळजी घ्या.

मात्र, सर्व वयाच्या नागरिकांना असा सल्ला आहे की सामाजिक अंतरीकरणाच्या उपायांचे काळजीपूर्वक पालन करा, हात अधूनमधून धुवा, एखाद्या व्यक्तीला हा रोग झाल्याचा तुम्हाला संशय असल्यास ती व्यक्ती पूर्णपणे बरी होईपर्यंत त्या व्यक्तीपासून दूर राहा आणि हा रोग तुम्हाला झाला आहे, असे वाटल्यास कोविड-19 करिता असलेल्या हॉटलाइन दूरध्वनीवर संपर्क करा.

विशेष आभार:    शाहिद जमील, सीईओ, वेलकम ट्रस्ट / डीबीटी इंडिया अलायन्स आणि

गगनदीप कांग, एक्झ‍िक्युटीव डायरेक्टर, टीएचएसटीआय