कोविड-19: काही गैरसमजांविषयी स्पष्टीकरण

Share

सर्वप्रथम ’इंडिया-बायोसायन्स’ संकेतस्थळावर प्रकाशित

कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी किंवा त्यावर उपचार करण्यासाठी ‘कलिली (कोलॉइडल) चांदी’ किंवा ‘बाष्पनशील तेले’ अशा घरगुती उपायांसंबंधी अयोग्य माहितीचा प्रसार समाज माध्यमांवर पाहात आहोत. यापैकी काही प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी आम्ही अशोका विद्यापीठ (सोनीपत) आणि इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमॅटिकल सायन्सेस (चेन्नई) येथील भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांचे प्राध्यापक गौतम मेनन यांना विनंती केली. त्यांनी केलेल्या कोविड-19 संबंधी काही महत्त्वाच्या खुलाशातून पुढील प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळतील.


प्रश्न: २२ मार्च २०२० रोजी भारताने राबविलेल्या ‘जनता कर्फ्यू’ सारख्या कर्फ्यूमुळे बहुतांशी विषाणू मारले जातील का?

कोविड-19 रोग नवीन कोरोनाविषाणूंमुळे होतो. हे विषाणू बाधित व्यक्तींमध्ये वाढतात आणि मुख्यत: त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर लोकांमध्ये संक्रामित होतात म्हणजे पसरतात. जेव्हा कोरोनाबाधित व्यक्ती खोकते किंवा शिंकते तेव्हा तिच्या नाकातोंडावाटे बाहेर पडलेल्या तुषारांमधून या विषाणूंचा प्रसार होऊ शकतो किंवा एखाद्या कोरोनाबाधित व्यक्तीशी हस्तांदोलन केल्यानंतर, तोच हात तुमच्या चेहऱ्याला लावल्यास तुम्हालाही संसर्ग होऊ शकतो. कोरोनाविषाणू, एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पोहोचण्याचा मुख्य मार्ग हाच आहे. एवढेच नाही, ज्या पृष्ठभागावर कोरोनाबाधित व्यक्तीच्या खोकल्याचे/शिंकेचे तुषार पडलेले असतात, त्याला हात लागल्यास ते हाताला चिकटून तुमच्याकडे पोहोचू शकतात.

नवीन कोरोनाविषाणू निरनिराळ्या पृष्ठभागांवर काही काळांकरिता सक्रिय राहू शकतात आणि हा काळ काही तासांपासून काही दिवसांचा असतो. म्हणूनच १४ तासांचा कालावधी, सर्व विषाणूंचा नाश होण्यासाठी किंवा दीर्घकालीन टाळेबंदी केली तरी सार्वजनिक जागांतील पृष्ठभागांवर असलेल्या विषाणूंचा नाश करण्यासाठी, अपुरा आहे.

खरं तर, टाळेबंदीमुळे आपली विषाणूंपासून सुटका होत असती तर विषाणूंपासून उद्भवणाऱ्या सर्व आरोग्यविषयक समस्या प्रत्येकाला वर्षातील एक दिवस घरी थांबायला भाग पाडून आपण सोडवू शकलो असतो.

मात्र, महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जेव्हा बाधित व्यक्तीकडून निरोगी व्यक्तीला या रोगाचा संसर्ग होतो, त्या संसर्गाची साखळी एकमेकांमध्ये ‘शारीरिक अंतर’ राखून तोडता येते. कर्फ्यूमुळे सुरक्षित अंतर पाळले जाऊन संसर्ग होण्याची शक्यता कमी करणे हा टाळेबंदीचा मुख्य उद्देश आहे. तसेच ज्यांना या रोगाचा संसर्ग झालेला आहे, त्यांना ओळखणे आणि विलगीकरण करणे, या बाबीही टाळेबंदीमुळे सहजपणे करता येऊ शकतात.

 

प्रश्न: आपण पुरेसे पाणी प्यायलो तर आपल्या जठरातील आम्ल विषाणूंचा नाश करते?

कित्येक विषाणू जठरातील आम्लात तग धरू शकतात. आपण अधिक पाणी प्यायलो, तर जठरातील आम्ल अधिक विरल होईल म्हणजेच आम्लाची तीव्रता कमी होईल. जसे, रसायनशास्त्राच्या प्रयोगशाळेत आम्लात पाणी मिसळून आम्ल विरल करतात तसे! त्यामुळे पुरेसे पाणी प्यायलो तर आम्लाचा प्रभाव उलट कमी होईल, वाढणार नाही.

नवीन कोरोनाविषाणू हा श्वसन संस्थेवर परिणाम करतो. यामुळे श्वास घेण्यात अडथळा येणे, हे कोविड-19 या रोगाचे मुख्य लक्षण आहे. जठराचा किंवा पोटाचा या विषाणूशी काहीही संबंध नाही आणि जठरातील आम्लाचीही यात काही भूमिका असण्याची शक्यता नाही.

 

प्रश्न: भारतीयांची रोगप्रतिकारशक्ती पाश्चिमात्यांपेक्षा चांगली असते, आणि त्याद्वारे भारतीय या रोगात तग धरून राहू शकतात?

हे जर खरे असते, तर भारतीय हे जगातील सर्वांत निरोगी लोक असते आणि आपले आयुर्मान इतर देशांतील लोकांपेक्षा अधिक असते. खरे तर, आयु:कालाच्या बाबतीत भारताचा जगात १२८ वा क्रमांक लागतो. १९१८ साली इंफ्लुएन्झाच्या साथीचा जगात सर्वांत मोठा परिणाम भारतावर झाला होता आणि ५ ते १०% भारतीय या साथीमुळे दगावले होते. 

हवेची गुणवत्ता लक्षात घेतली, तर जगातील सर्वाधिक प्रदूषित १० शहरांपैकी ७ शहरे भारतात आहेत, आणि मधुमेही रुग्णांच्या संख्येच्या बाबतीतही भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. या दोन्हींचा अर्थ असा की नवीन कोरोनाविषाणूमुळे भारतीयांनादेखील बराच त्रास होण्याची खूप शक्यता आहे.

आपल्या शरीराने आजपर्यंत नवीन कोरोनाविषाणूसारखा विषाणू अनुभवलेला नाही. त्यामुळे, जगातील इतर लोकांकडे नसलेली काही खास प्रतिकारशक्ती भारतीयांकडे असेल, याची शक्यता वाटत नाही.

 

प्रश्न: उष्ण हवामानामुळे विषाणूचा नाश होईल, किंवा त्याच्या संसर्गाला आळा बसेल?

आजवरच्या माहितीनुसार, या विषाणूवर हवेच्या तापमानाचा काय परिणाम होऊ शकेल, यासंबंधी काही निश्चित सांगता येत नाही. पण केवळ हवामान उष्ण किंवा दमट झाल्याने हा विषाणू नष्ट होईल, अशी कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. काही बाबतीत हे खरे आहे की इंफ्लुएन्झासारख्या विषाणूंच्या साथी ठराविक ऋतूमध्ये येतात. जसे, उत्तर गोलार्धातील थंड हवामानाच्या प्रदेशांत ‘फ्लू सीझन’ साधारणपणे हिवाळ्यात येतो. पण हे लक्षात घेतले पाहिजे की जेव्हा उत्तर गोलार्धात उन्हाळा असतो तेव्हा दक्षिण गोलार्धात हिवाळा चालू असतो. त्यामुळे हा विषाणू तेथे काही महिने काढून मग परत येऊन आपल्याला संसर्ग करू शकतो. ऋतुबदलामुळे उद्भवणाऱ्या अनेक शक्यतांपैकी ही एक शक्यता आहे.

 

प्रश्न: आयब्युप्रोफेन घेतल्याने कोविड-19 ची लक्षणे बळावतात?

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) सध्याच्या सल्ल्यानुसार, कोविड-19 ची लक्षणे आढळल्यास आयब्युप्रोफेन घेण्यात कोणतीही अडचण नाही.

 

प्रश्न: मी तरुण आणि निरोगी असल्यास मला काळजी घेण्याची किंवा शारीरिक अंतर पाळण्याची काही गरज नाही?

तुम्ही कदाचित या रोगाचा सामना करू शकालही! पण तुमच्या आजूबाजूला वृद्ध, आजारी किंवा कमी रोगप्रतिकारशक्ती असलेल्या व्यक्ती असतात, त्यांचाही तुम्ही विचार केला पाहिजे. तुमच्यामुळे जर त्यांना संसर्ग झाला तर चालेल का? दुसरा मुद्दा असा की, तरुण आणि निरोगी रुग्णांमध्येही गंभीर स्वरूपाचे आजार आणि मृत्यूच्या घटना आढळून आल्या आहेत आणि त्यामागील कारण अजून कोणालाही समजलेले नाही. त्यामुळे तरुण आणि निरोगी असल्याने तुम्ही रोगापासून किंवा इतरांवर होणाऱ्या परिणामांपासून सुटाल, असे मुळीच नाही.

 

प्रश्न: वाफारा घेण्याने विषाणू नष्ट होईल?

यावर विश्वास ठेवण्याचे कोणतेही सबळ कारण नाही. याउलट, जर तुम्ही वाफारा घेताना काळजी घेतली नाही, तर वाफेने त्वचा जळू शकते.

 

प्रश्न: कलिली (कोलाइडल) चांदी, जीवनसत्त्वे, चहाचे प्रकार किंवा विशिष्ट तेले वापरून कोविड-19 वर उपचार करता येऊ शकतात?

कलिली (कोलॉइडल) चांदी, जीवनसत्त्वे, चहाचे प्रकार, किंवा विशिष्ट तेले यांचा कोविड-19 रोगाशी प्रतिकार करताना काही खास फायदा होतो, याचे कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीत.

 

प्रश्न: आले, लिंबू, मध आणि भारतीय मसाले हे कोविड-19 रोगाचा प्रतिकार करण्यासाठी उपयुक्त आहेत?

यासाठी कोणताही पुरावा उपलब्ध नाही. भारतीय मसाल्यांमध्ये काही जीवाणूरोधी गुणधर्म असतात. पण कोविड-19 रोगाचा कारक एक विषाणू आहे, जीवाणू नाही.

 

प्रश्न: टाळ्या वाजवल्याने जी कंपने निर्माण होतात, त्यांमुळे विषाणूचा नाश होतो?

टाळ्या वाजवल्याने हवेत आवाजाची कंपने निर्माण होतात. हा आवाज आपल्या कानाच्या पडद्यावर पडतो, आणि त्यामुळे आपल्या कानामधील द्रवामध्ये कंपने निर्माण होतात. विषाणूचे आकारमान हे कानाच्या पडद्याच्या जाडीच्या निदान दहा लाख पट कमी असते. विषाणूला या कंपनांची जाणीवही होणार नाही. तेव्हा हा समज खरा असेल, असे समजण्याचे काहीही कारण नाही.

 

प्रश्न: मंत्रोच्चाराने विषाणू नष्ट होऊ शकतो?

याचे उत्तर आधीच्या उत्तराप्रमाणेच आहे. मंत्रोच्चाराने निर्माण होणारी कंपने विषाणूएवढ्या सूक्ष्म गोष्टीवर कोणताही परिणाम करू शकणार नाहीत.

 

प्रश्न: कोविड-19 च्या एकंदरीत परिस्थितीमुळे निसर्गाचा समतोल सावरला जात आहे, आणि आपल्याला अंतर्मुख होऊन विचार करायला भाग पाडले आहे?

निश्चितच, कोविड-19 रोगाने आपण परस्परांशी जोडलेल्या, परस्परांवर अवलंबून असलेल्या एका जगात राहतो, याची आपल्याला जाणीव करून दिलेली आहे. प्राण्यांचा नैसर्गिक अधिवासांचा होत असलेला ऱ्हास, आणि वन्य प्राण्यांची तस्करी यांचा परिणाम म्हणून प्राण्यांमधील विषाणूंमुळे होणारे रोग माणसांत पसरतात, हेदेखील आपल्याला कळून चुकलेले आहे. या गोष्टींवर नियंत्रण ठेवले, तर आपण आपले जीवन अधिक आनंदी आणि निरोगी बनवू शकतो आणि पुढच्या पिढीसाठी अधिक चांगले जग निर्माण करू शकतो.