कोविड-19 च्या प्रसारावर नियंत्रण ठेवण्यासाठी डिजिटल संपर्क यंत्रणेचा वापर

Share

 

चित्रसौजन्य: Pixabay/geralt


कोविड-19 हा रोग तीव्र श्वास पीडा संलक्षणकारक-कोरोनाव्हायरस-2 म्हणजेच सार्स-कोवी-2 मुळे होत असून त्यामुळे दीर्घकाळ टिकेल अशी महामारी जगात उद्भवली आहे. अद्याप या रोगावर कोणतीही लस उपलब्ध नसल्याने, रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा मागोवा घेणे, रुग्णांचे विलगीकरण करणे आणि सार्वजनिक ठिकाणी शारीरिक अंतर पाळणे हे उपाय लोकांच्या रक्षणासाठी अधिक सुरक्षित आहेत. 

सायन्स या संशोधनपत्रिकेत प्रकाशित झालेल्या एका नवीन अभ्यासानुसार, युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड मधील वैज्ञानिकांच्या गटाने सार्स-कोवी-2 प्रसाराच्या कळीच्या प्राचलांचा (पॅरामीटर) अभ्यास करण्यासाठी एक गणितीय प्रारूप विकसित केलेले आहे. विषाणूंचा प्रसार ज्या चार मार्गांनी होऊ शकतो, त्यांची या वैज्ञानिकांनी तुलना केली आहे: बाधित व्यक्तीकडून होणारा प्रसार, ज्या व्यक्तीमध्ये अजून लक्षणे दिसून यायची आहेत अशा लक्षण-पूर्व व्यक्तीकडून होणारा प्रसार, ज्या व्यक्तीमध्ये लक्षणे कधीच दिसून येत नाहीत अशा लक्षणरहित व्यक्तीकडून होणारा प्रसार आणि दूषित पृष्ठभागापासून होणारा प्रसार. या प्रारूपानुसार, या रोगाच्या प्रसाराला लक्षण-पूर्व व्यक्ती मुख्य कारणीभूत असून त्यांच्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत भर पडू शकते आणि याचे प्रमाण एकूण संसर्गाच्या ५०% ते ६५% इतके असू शकते, असे आढळले आहे.

साथरोगविज्ञानात, मूलभूत पुनरुत्पादन संख्या (R0) ही महत्त्वपूर्ण मानली जाते. म्हणजेच एखाद्या लोकसमूहात जेथे प्रत्येक व्यक्तीला रोगाचा संसर्ग होण्याचा धोका असतो, तेथे एका बाधित व्यक्तीपासून किती व्यक्तींना संसर्ग होऊ शकतो, याच्या प्रमाणाला R0 म्हणतात. साथीच्या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी R0 ची संख्या १ पेक्षा खाली उतरावी लागते, ज्यामुळे रोगाची साथ ओसरायला मदत होते. गुंतागुंतीच्या गणनेवर आधारित, संशोधकांनी असे सूचित केले आहे की कोविड-19 सारख्या महामारीचे दमन करण्यासाठी केवळ संपर्कात आलेल्या व्यक्तींचा मागोवा घेऊन चालणार नाही, कारण त्याला बराच वेळ लागू शकतो, आणि यादरम्यान हा रोगाचा प्रसार लक्षण-पूर्व व्यक्तींद्वारे आणखी वेगाने घडून येऊ शकतो.

या अभ्यासातून संशोधकांनी, मोबाईल फोनमध्ये याकरिता एखादे ॲप (ॲप्लीकेशन) वापरण्याची शिफारस केली आहे, जिच्याद्वारे वापरकर्त्याच्या नजीकच्या संपर्कांत आलेल्या व्यक्तींची माहिती मिळेल. जर मोबाइल वापरणाऱ्या व्यक्तीमध्ये कधीही कोविड-19 ची लक्षणे विकसित झाली, तर तिच्या संपर्कातील सर्व व्यक्तींना तत्काळ आणि गुप्तपणे सूचित करता जाईल. अशा परिस्थितीत, ज्यांना सूचना मिळालेली आहे त्या व्यक्ती स्वत: अलग होऊ शकतील आणि त्यामुळे संसर्ग पसरण्याची शक्यता कमी होईल.

असा मोबाइल ॲप वापरणाऱ्या व्यक्तींचा मागोवा मोबाइलमध्येच असलेल्या ब्लूटूथ तंत्राद्वारे घेता येऊ शकतो. जेव्हा वापरकर्ता अ‍ॅप-आधारित सार्स-कोवी-2 चाचणीची मागणी करेल आणि त्या व्यक्तीने ॲपमध्ये भरलेल्या माहितीनुसार चाचणी सकारात्मक आली, तर त्या व्यक्तीचे निदान मध्यवर्ती सर्व्हरकडे पोहोचविण्यात येईल. त्याचक्षणी सर्व्हरमधील प्रसार यंत्रणा कार्यान्वित होईल आणि ज्या व्यक्तीने ऑनलाइन चाचणी केली आहे, त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींना त्वरित यासंबंधी सूचित केले जाईल. 

अशा मोबाइल ॲपचा वापर केल्यास संपर्कात आलेल्या व्यक्तींचा माग घेण्याची प्रक्रिया वेगाने होऊ शकते, तसेच प्रत्यक्षपणे एकेका व्यक्तीला संपर्क करण्यात जो उशीर होतो, तो टाळता येऊ शकतो आणि कोविड-19 महामारीवर चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवू शकतो, असे संशोधकांचे म्हणणे आहे.

मात्र, संशोधक हेदेखील कबूल करतात की अशा ॲपच्या वापराने वापरकर्त्याच्या वैयक्तिक माहितीमध्ये इतर जण शिरकाव करू शकतात, तसेच पारदर्शकता आणि संरक्षण यांबाबतचे नैतिक प्रश्न निर्माण होऊ शकतात. 

या चमूने संकेतस्थळावर अशी व्यवस्था (वेब इंटरफेस) विकसित केलेली आहे, जिच्याद्वारे जेव्हाजेव्हा नवीन माहिती उपलब्ध होईल, तेव्हातेव्हा आधीची जुनी माहिती अद्ययावत होईल आणि महामारी उत्क्रांत झाली, तर पुढील संशोधनासाठी हा माहितीचा स्रोत उपयोगी पडेल.

 

स्तुती महापात्रा सध्या नॅशनल ब्रेन रिसर्च सेंटर, मानेसर येथे न्यूरोव्हायरॉलॉजी विषयात पीएच.डी. स्तरावरील संशोधन करीत आहेत.