कोविड-19 महामारीच्या काळात अतिरक्तदाबाशी लढाई

Share


अतिरक्तदाब हा कोविड-19च्या काही रुग्णांमध्ये एक सहविकार (कोमॉर्बिडीटी) बनला आहे आणि कोविड-19 च्या रुग्णांसाठी ही बाब धोका ठरू शकतो, असा एक अंदाज आहे. तसेच, अनेक अहवालांतून कोविड-19 रुग्णांमध्ये एंजियोटेंसिन-रूपांतरण विकर-2 (ACE-2) हे नवीन कोरोनाविषाणूसाठी ग्राही म्हणून कार्य करीत असल्याचे लक्षात आल्यापासून एंजियोटेंसिन-रूपांतरण विकर-2 अवरोधी (ACE-अवरोधी) किंवा एंजियोटेंसिन ग्राही रोधी (ग्राहींना अडविणारे, AR-रोधी) या औषधांच्या योग्यतेबाबत प्रश्न उपस्थित झालेले आहेत आणि त्यामुळे याबाबत गुंतागुंत वाढली आहे. सदर लेख कोविड-19 च्या महामारीच्या काळात, अतिरक्तदाबाशी सामना कसा करावा याचे विहंगावलोकन करण्याच्या उद्देशाने लिहिलेला आहे.

कोविड-19 रुग्णांकरिता अतिरक्तदाब धोकादायक असू शकतो का? 

सुरुवातीच्या अभ्यासांमधून कोविड-19 बाधित रुग्णांमध्ये अतिरक्तदाब, मधुमेह आणि वृक्काचे विकार यांसह इतर आजार आढळून आले आहेत. यात कोविड-19 चा तीव्र संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये अतिरक्तदाब असलेले रुग्ण अधिक (24%) आहेत आणि सौम्य संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये अतिरक्तदाब असलेले रुग्ण कमी (13%) आहेत. याच्याशीच सुसंगत दुसरे निरीक्षण कोविड-19 बाधित सुमारे २८०० रुग्णांच्या अभ्यासातून पुढे आलेले आहे. या संदर्भात, ‘वय’ यासारखा घटक लक्षात घेऊनही अतिरक्तदाब असलेल्या आणि नसलेल्या समतुल्य गटाबरोबर तुलना केली, तर अतिरक्तदाब असलेल्या रुग्णांमध्ये मृत्यूचा धोका दुपटीने असतो, आणि कोविड-19 रोग अधिक तीव्र होण्याची शक्यता असते, असे दिसले आहे. यावरून, ज्या रुग्णांमध्ये रक्तदाब वाढलेला असतो त्यांच्यामध्ये कोविड-19 मुळे आणखी गुंतागुंत वाढून धोका असू शकतो.

नवीन कोरोनाविषाणू (सार्स-कोवि-2) मानवी पेशीमध्ये प्रवेश कसा करतो? 

विषाणू स्वतंत्रपणे टिकू शकत नाही; त्याच्या प्रसारासाठी आश्रयी (मानवी) पेशीची गरज असते. मानवी पेशींभोवती एक सच्छिद्र आवरण (पेशीपटल) असते. या आवरणावरची छिद्रे म्हणजेच पेशीचे दरवाजे असून तेथे ग्राही असतात आणि पेशीमध्ये प्रवेश कोणाला द्यायचा, हे ग्राही ठरवितात. हे ग्राही फक्त त्यांच्याशी अनुरूप संयुगांशी - म्हणजे एखादे कुलूप जसे विशिष्ट किल्लीने उघडते - जोडली जातात. मानवी पेशींच्या पृष्ठभागावर एंजियोटेंसिन-रूपांतरण विकर-2 (ACE-2) नावाचे ग्राही असते आणि याच ग्राहीला नवीन कोरोनाविषाणू जोडला जाऊन मनुष्याच्या पेशीमध्ये प्रवेश करतो. दरवाजा उघडण्यासाठी किल्ली म्हणून तो आपल्या पृष्ठभागावर खिळ्यांसारख्या संरचना असलेल्या S-प्रथिनाचा वापर करतो, जी त्याच्या पृष्ठभागावर मुबलक असतात. या S-प्रथिनांच्या खिळ्यासारख्या संरचनेवरूनच या विषाणूंना कोरोनाविषाणू असे नाव पडले आहे (आकृती 1 पहा).

आकृती 1: फुप्फुसे, हृदय, वृक्के याणि आतडे यांसह विविध प्रकारच्या पेशीपटलावर असलेल्या ACE-2 ग्राहीशी नवीन कोरोनाविषाणू जोडला जातो (चित्रसौजन्य: धन्या आर. आणि जननी व्ही.)

एंजियोटेंसिन-रूपांतरण विकर-2 (ACE-2) ग्राही हे आतडी, हृदय, फुप्फुसे, वृक्के आणि रक्तवाहिन्या या इंद्रियांसह शरीराच्या वेगवेगळ्या ऊतींमध्ये असतात. कोविड-19 चा संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये अधिककरून फुप्फुसशोथ (न्युमोनिया) झाल्याचे आढळून आलेले आहे. यामागील एक कारण म्हणजे नवीन कोरोनाविषाणूचा फैलाव श्वसनमार्गातून सहजपणे होत असावा, असे मानले जाते. तसेच इतर ऊतींमध्येदेखील एंजियोटेंसिन-रूपांतरण विकर-2 (ACE-2) असल्याने सहविकारी रुग्णांमध्ये कोविड-19 रोगामुळे गंभीर परिणाम होत असावेत, असे स्पष्ट होते.

रक्तदाब नियमित राखण्यात एंजियोटेंसिन-रूपांतरण विकर-2 (ACE-2) ची भूमिका काय असते? 

रक्तदाब नियमित राखण्यात आपल्या शरीरातील रेनिन-एंजियोंटेंसिन प्रणाली (RAS) ही कळीची भूमिका बजावत असते (आकृती 2 पहा). रेनिन (वृक्काद्वारे स्रवले जाणारे विकर) या विकराद्वारे एंजियोटेंसिनोजेन (यकृताद्वारे जाणारे संप्रेरक) संप्रेरकाचे जलापघटन घडून येते आणि एंजियोटेन्सिन-I (Ang-I) बनते आणि त्याचे ACE-2 मुळे एंजियोटेंसिन-II (Ang-II) मध्ये रूपांतर होते. Ang-II चे AT1R या (एंजियोटेंसिन-II ग्राही प्रकार 1) ग्राहीमार्फत रक्तवाहिन्यांचे आकुंचन घडून येते आणि रक्तदाब वाढतो. ACE-2 मुळे Ang-II चे अपघटन होऊन Ang1-7 प्रकारची पेप्टाईडे तयार होतात, त्यांची Mas नावाच्या ग्राहीशी क्रिया होऊन रक्तवाहिन्या विस्फारल्या जातात आणि रक्तदाब कमी होतो. म्हणूनच अतिरक्तदाब, हृदयविकाराचा झटका, हृदयविराम आणि जुनाट वृक्कविकार यांसारख्या विकारांवर सामान्यपणे ACE-अवरोधी किंवा AT1R रोधी (त्यांना ARBs-एंजियोटेंसिन रिसेप्टर ब्लॉकर्स म्हणत असून त्यासाठी AR-रोधी हीच संज्ञा वापरली आहे) अशी औषधे सुचवली जातात. 

आकृती 2:  रेनिन-एंजियोटेंसिन प्रणालीद्वारे रक्तदाबाचे नियमन.

Ang: एंजियोटेंसिन; AT1R: एंजियोटेंसिन-II ग्राही प्रकार 1; MasR: Mas ग्राही

(चित्रसौजन्य: धन्या आर. आणि जननी व्ही.)

 

कोविड-19 बाधित रुग्णांमधील रक्तदाब कमी करणाऱ्या औषधांविषयी कोणते मतभेद आहेत? 

अतिरक्तदाब कमी करणाऱ्या औषधांचा परिणाम एंजियोटेंसिन-रूपांतरण विकर-2 (ACE-2) यावर कसा होतो, यासंबंधी पद्धतशीर केलेल्या अभ्यासातून परस्परविरोधी आकडेवारी उपलब्ध झाली आहे. काही उंदरांमध्ये, लिसिनोप्रिल नावाच्या ACE-अवरोधी औषधाच्या वापरामुळे हृदय आणि वृक्क यांतील ऊतींमध्ये एंजियोटेंसिन-रूपांतरण विकर-2 च्या प्रमाणात वाढ झाल्याचे आढळून आले. दुसऱ्या बाजूला रॅमिप्रिल या ACE-अवरोधी औषधामुळे उंदरांच्या हृदयाच्या ऊतींमध्ये एंजियोटेंसिन-रूपांतरण विकर-2 मध्ये वाढ होत नसल्याचे आढळले आहे. एंजियोटेंसिन-रूपांतरण विकर-2 च्या बाबतीत AR-रोधी (एंजियोटेंसिन ग्राही-रोधी) औषधांच्या वापरामुळेदेखील परस्परविरोधी परिणाम आढळून आले आहेत. नवीन कोरोनाविषाणू हा एंजियोटेंसिन-रूपांतरण विकर-2 द्वारे शरीरात प्रवेश करीत असल्याने, प्राण्यांवर केलेल्या अभ्यासातून ACE-अवरोधी औषधांच्या वापराबाबत दोन परस्परविरोधी सिद्धांत उपस्थित झाले आहेत. 

सिद्धांत 1: अतिरक्तदाब असलेल्या कोविड-19 रुग्णांना ACE-अवरोधी औषधे देऊ नयेत

ACE-अवरोधी औषधांमुळे ACE2 मध्ये वाढ होत असल्याने नवीन कोरोनाविविषाणूला पेशीमध्ये शिरायला अधिक ग्राही उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे नवीन कोरोनाविषाणू फैलावू शकतात आणि रुग्णाची स्थिती खालावू शकते (आकृती 3 पहा). 
 

आकृती 3: कोविड-19 बाधित रुग्णांमध्ये ACE-अवरोधी औषधांमुळे होणाऱ्या संभाव्य घातक परिणामांचे चित्र (चित्रसौजन्य: धन्या आर. आणि जननी व्ही.)
 

सिद्धांत 2: उच्च-रक्तदाब असलेल्या कोविड-19 रुग्णांसाठी ACE-अवरोधी औषधे सुरक्षित ठरू शकतात

AR-रोधी आणि ACE-अवरोधी औषधांमुळे एंजियोटेंसिन II-मार्फत अतिरक्तदाबाचे परिणाम कमी होतात. त्यामुळे एंजियोटेंसिन 1-7 ही संयुगे बनू शकतात, जी दाह कमी करतात आणि रुग्णाला सुरक्षित ठेवण्यात मदत करू शकतात (आकृती 4 पहा).

आकृती 4: कोविड-19 बाधित रुग्णांमध्ये ACE-अवरोधी औषधांमुळे होणाऱ्या संभाव्य फायदेशीर परिणामांचे चित्र (चित्रसौजन्य: धन्या आर. आणि जननी व्ही.)

 

इटली, इंग्लंड आणि अमेरिका येथे झालेल्या मानवी अभ्यासांमधून असा निष्कर्ष निघालेला आहे की कोविड-19 आणि ACE-अवरोधी तसेच AR-रोधी यांच्यात कोणताही महत्त्वाचा संबंध दिसून आलेला नाही. इटलीमधून झालेल्या एका अहवालात असा उल्लेख आहे की ACE-अवरोधी आणि AR-रोधी ही औषधे बहुतकरून अतिरक्तदाब कमी करण्यासाठी वापरली जातात. चीनमध्ये, समवयीन गटाच्या अभ्यासामधून असे आढळले आहे की अतिरक्तदाबावर उपचार न घेतलेल्या कोविड-19 बाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण हे अतिरक्तदाबावर औषधे घेणाऱ्या रुग्णांच्या मृत्यूपेक्षा अधिक होते.

याच अनुषंगाने युरोपिअन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजी, युरोपिअन सोसायटी ऑफ हायपरटेन्शन, इंटरनॅशनल सोसायटी ऑफ हायपरटेन्शन, अमेरिकन हार्ट असोसिएशन, हार्ट फेल्युअर सोसायटी ऑफ अमेरिका आणि अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिऑलॉजी या संस्थांनी ही चुकीची माहिती काढून टाकण्यासंबंधी सूचना केलेल्या आहेत आणि कोविड-19 च्या रुग्णांवर ACE-अवरोधी आणि AR-रोधी अशा औषधांचा वापर करण्याबाबत योग्य ते निर्णय घ्यावेत, अशा सूचना दिलेल्या आहेत. थोडक्यात,

१. कोविड-19 च्या रुग्णांमध्ये ACE-अवरोधी किंवा AR-रोधी या औषधांचे चांगले किंवा वाईट असे कोणतेही परिणाम दिसून आल्याचा शास्त्रीय आधार नाही. 

२. ज्यांना ACE-अवरोधी आणि/किंवा AR-रोधी प्रकारची औषधे लिहून दिलेली असतील, अशा कोविड-19 बाधित रुग्णांची औषधे चालू ठेवायला हवीत.

३. ACE-अवरोधी किंवा AR-रोधी या औषधांच्या उपचारांमध्ये बदल करण्यापूर्वी प्रत्येक रुग्णाला वैयक्तिक पातळीवर गरज आहे किंवा नाही, याचा विचार करायला हवा.

शेवटी, तज्ज्ञांनी ACE-अवरोधी किंवा AR-रोधी या औषधांचा वापर पुढील अभ्यासातून काही वेगळे निष्कर्ष येईपर्यंत चालू ठेवावा, असे सुचविले आहे. या क्षेत्रात अधिक सर्वंसमावेशक संशोधन करण्याची गरज असून त्यामुळे ज्या कोविड-19 रुग्णांमध्ये अतिरक्तदाबासारखा सहविकार आहे, अशा रुग्णांकरिता इष्टतम औषधोपचार करायला मदत होऊ शकते.

 

नितीश महापात्रा हे आयआयटी-मद्रास, डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलजी येथील भूपत आणि ज्योती मेहता स्कूल ऑफ बायोसायन्सेस मध्ये प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत. धन्या आर. आणि जननी वी. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. करीत आहेत.