घंटाघरातील वटवाघळे: मित्र की शत्रू?

Share

जगात दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या असलेल्या भारतातील ही संध्याकाळ आहे. अशा वेळी जेव्हा कोट्यावधी लोक आपल्या शेतातून, कारखान्यांमधून, कार्यालयांतून आणि वनांमधून आपल्या घरी परततात, त्याचवेळी सव्वाशेपेक्षा जास्त वेगवेगळ्या जातींची1 लाखो वटवाघळे त्यांच्या निवासांमधून जसे झाडांमधून, गुहांमधून, खडकांच्या कपारींतून, मंदिरातून आणि प्रार्थनास्थळांपासून बाहेर पडतात. ती रात्रभर शेतांत, मैदानांत, वनांत, गवताळ भूमीत तसेच आपल्या घरालगत वनस्पतींवर वाढणाऱ्या अनेक हानीकारक कीटकांचा आणि मनुष्यामध्ये रोग पसरवणाऱ्या डासांचा फडशा पडतात2. काही वटवाघळे फुलांतील मकरंद शोषून घेतात, परागीभवन करतात, फळे खातात, तसेच आर्थिकदृष्ट्या आणि पर्यावरणीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या मोह, जांभूळ, अंजीर, काजू यांसारख्या वनस्पतींच्या बियांचा उडतउडत प्रसार करतात2

 

वटवाघळे पर्यावरणात अनेक महत्त्वाच्या भूमिका पार पाडत असताना देखील या प्राण्याबद्दल दुर्दैवाने सर्वांत जास्त गैरसमज ऐकायला येतात. त्यांना बहुधा अपशकुनी किंवा दुर्भाग्यपूर्ण मानले गेले आहे, भय आणि अपयशाचे अग्रदूत मानले गेले आहे आणि अनेक गोष्टींमध्ये तसेच दंतकथांमध्ये लोकांनी त्यांच्याबद्दल वाईटसाईट लिहिले आहे, त्यांना छळले आहे. खासकरून सध्याच्या कोविड-19 महामारीच्या काळातही हेच खरे असल्याचे दिसून येत आहे. शास्त्रीय पुराव्यांमधून कोविड-19 ला कारणीभूत असणाऱ्या सार्स-कोवी-2 विषाणूंची उत्पत्ती वटवाघळांमध्ये झाली (वटवाघळे माणसांना संक्रामित करण्याआधी मुंगीखाऊसारख्या संभाव्य आश्रयी प्राण्यांना बाधित करतात) हे समजल्याने तर त्यांच्यामुळे आणखी रोगाचे संक्रामण मनुष्यामध्ये होऊ शकते, अशी भीती वाटत आहे. खरेतर, वटवाघळांपासून उद्भवणाऱ्या विषाणूंचा संसर्ग थेट माणसांमध्ये क्वचितच होतो. मात्र जसजशी ही भीती वाढत आहे आणि अफवा पसरत आहेत, तसतसे मानवी वस्त्यांलगतच्या परिसरातील वटवाघळांचा संपूर्ण नाश करण्यासाठी आणि त्यांची निवासस्थाने असलेली फळझाडे तोडून टाकण्यासाठी मागण्या वाढीला लागल्या आहेत3,4. अशी कृती खरोखरच योग्य आहे का आणि त्यामुळे कोणता उद्देश साध्य होणार आहे? या लेखात आम्ही वटवाघळासंबंधीच्या कथांना न्याय देणार आहोत, त्यांच्याबाबतची मिथके दूर करणार आहोत आणि मनुष्याच्या कल्याणासाठी आणि परिसंस्थांचे कार्य नीट चालण्यासाठी त्यांचे असलेले महत्त्व याबाबत चर्चा करणार आहोत.

 

वटवाघळे खास का आहेत?

वटवाघळे एकमेव सस्तन प्राणी आहेत ज्यांच्यात उडण्याची क्षमता असते. त्यांचा गट अतिशय जातीसंपन्न असून, त्यांच्या सुमारे १२०० जाती जगात2 आढळतात आणि यांत दरवर्षी नवीन जातींची भर पडत आहे. जगातील सस्तन प्राण्यांमध्ये, विविधतेच्या दृष्टीने कृंतकांच्या खालोखाल (कृंतक म्हणजे कुरतडणारे प्राणी. यात उंदीर, सायाळ, हॅमस्टर, खार इत्यादी प्राणी येतात) दुसऱ्या स्थानावर वटवाघळांचा गट असून सस्तन प्राण्यांमध्ये सुमारे २०% जाती वटवाघळांच्या आहेत. वेगळ्या शब्दांत सांगायचे झाले तर, सस्तन प्राण्यांच्या पाच जातींमागे एक जाती वटवाघळांची असते. त्यांच्या आकारमानात विविधता दिसून येते; जगातील सर्वांत लहान सस्तन प्राणी म्हणजे बंबल-बी वटवाघूळ असून त्याचे वजन जेमतेम २ ग्रॅम इतके असते, तर सर्वांत मोठे वटवाघूळ म्हणजे फ्लाइंग फॉक्स असून त्याचे वजन सुमारे १.६ किग्रॅ. असते. मोठ्या वटवाघळांचा पंखविस्तार २ मीटरपर्यंत असू शकतो आणि दोन रात्रींत ते सुमारे ५०० किमी. एवढे अंतर उडून जाऊ शकतात5. वटवाघळांच्या बहुतेक जाती (सु. ७०% पेक्षा अधिक) कीटकभक्षी म्हणजे कीटकांचे भक्षण करतात. उरलेल्या जाती बहुतेक फळे आणि मकरंद यांचे सेवन करतात म्हणजे फलाहारी आहेत, तर अमेरिकेतच आढळणाऱ्या वटवाघळांच्या ३ जाती प्राण्यांचे रक्त शोषून घेणाऱ्या रक्तपिपासू म्हणून ओळखल्या जातात. भारतात वटवाघळांच्या सुमारे १२८ जाती आढळतात आणि त्यांपैकी १२ जाती फळांवर जगतात.

 

वटवाघळे वेगवेगळ्या अधिवासांत आढळतात; ती उंच पर्वतीय प्रदेशापासून उष्ण प्रदेशातील सदाहरित वनांमध्ये राहतात, तसेच वाळवंटापासून नागरी वस्त्यांमध्येही दिसून येतात. ते सामान्यपणे गुहांमध्ये, झाडांच्या ढोल्यामध्ये आणि पानांमध्ये, घरांतील किंवा मंदिरांतील  छतांचा  आश्रय घेतात. काही वटवाघळे एकेकटी राहतात, तर बहुतेक समाजप्रिय असून ते मोठ्या समूहाने राहतात. ब्रॅकन केव्ह, टेक्सास (अमेरिका) येथे टॅडारीडा ब्रासीलिएन्सिस (मेक्सिकन फ्री-टेल्ड बॅट) या जातीच्या कीटकभक्षी वटवाघळांची जगातील सर्वांत मोठी वसाहत असून तेथे सुमारे २ कोटी वटवाघळे आहेत, जी सस्तन प्राण्यांची जगात कोठेही आढळून न येणारी मोठी वसाहत आहे. तुलनाच करायची झाली तर, नवी दिल्लीतील एकूण लोकसंख्या एकाच गुहेत राहिल्यासारखी ही स्थिती आहे.

 

आपण वटवाघळांची काळजी घेणे का गरजेचे आहे?

वटवाघळे परिसंस्थांमध्ये पारिस्थितिकीदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या भूमिका बजावतात आणि कीटकनियंत्रण, बीजप्रसार, परागीभवन, खतांचा पुरवठा आणि अन्न सुरक्षा अशा अनेक बाबतीत मानवाला सेवा देतात आणि फायदेशीर ठरतात. कीटकभक्षी वटवाघळे पिकांची हानी करणाऱ्या कीटकांवर जगतात आणि मनुष्यामध्ये रोगांचे संक्रामण करणाऱ्या डासांचे भक्षण करतात; प्रत्येक रात्री ती त्यांच्या शरीराच्या वजनाच्या अर्धे ते दोन तृतीयांश भागाइतके कीटकांचे भक्षण करतात2. अशा प्रकारे, पिकांचे नुकसान टाळण्यात आणि किटकनाशकांची गरज कमी करण्यात ती निर्णायक सेवा पुरवितात. थायलंडमधील एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, वटवाघळांद्वारे झालेल्या तांदळाच्या पिकावरील कीड नियंत्रणामुळे सुमारे दहा लाख डॉलर वाचले आहेत किंवा एका वर्षाकाठी सुमारे २६००० लोकांच्या जेवणाची गरज त्यांच्यामुळे भागली आहे6. जगात, वटवाघळांमुळे घडून आलेल्या कीटक नियंत्रणाच्या सेवेची किंमत सुमारे ५४ अब्ज डॉलर ते १००० अब्ज डॉलर इतकी होऊ शकते7.

 

फलाहारी वटवाघळांच्या अनेक जाती परागीभवनासाठी, बीजप्रसारासाठी मदत करतात आणि मानवाची गरज असलेले इमारती लाकूड, अन्न, तंतू, जनावरांसाठी चारा, ताजी फळे, रंगपदार्थ आणि औषधे यांसारख्या अनेक उत्पादनांच्या निर्मितीत हातभार लावतात2. असा अंदाज आहे की जगातील सुमारे एक तृतीयांश अन्नाचे उत्पादन - यांत ११३ मुख्य खाद्यपिकांपैकी ८७ पिके असून त्यांची अंदाजे किंमत २०० अब्ज डॉलर्स इतकी होते – ती कीटक, वटवाघळे आणि पक्षी यांच्याद्वारे झालेल्या परागीभवनावर अवलंबून असते8. भारतात फलाहारी वटवाघळांच्या प्टेरोपस जिगँशियस, रुसेटस लेस्चेनॉल्टी आणि सायनोप्टेरस स्फिंक्स या तीन जाती सुमारे ११४ पेक्षा अधिक वनस्पतींच्या परागीभवनासाठी आणि बीजप्रसारासाठी मदत करतात9. या वनस्पतींपैकी बऱ्याच जाती पारिस्थितिकीदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या आणि औषधीदृष्ट्या महत्त्वाच्या असून त्यांमध्ये केळी, पेरू, काजू, आंबा, अंजीर, मोह आणि इतर फळांच्या वन्य जातींचा समावेश आहे. जेथे वृक्षांची लागवड फळांसाठी केली जाते अशा ठिकाणी फलाहारी वटवाघळांचे निवासस्थान असल्यास तेथील बियाणे दर्जेदार असल्याने शेतकऱ्यांसाठी चांगल्या बियाणांचा स्रोत ठरतात. उदा., भारतातील काजूचे पीक. मात्र फलाहारी वटवाघळे जरी मुख्यत: अधिक पिकलेल्या फळांचे सेवन करत असले तरी फळपिकांचे नुकसान करतातच. तथापि, आपल्या जीवनात वटवाघळांचे योगदान नसले, तर आपल्याकडे त्यामानाने कमी अन्ननिर्मिती होईल आणि कीटकांच्या संख्येत खूप मोठी वाढ होईल.

 

गुहेतून काढलेल्या वटवाघळांच्या विष्ठेमध्ये (वटवाघळांच्या विष्ठेला ग्वानो म्हणतात) नायट्रोजन आणि फॉस्फरस यांचे प्रमाण अधिक असल्याने शेतातील पिकांसाठी ती खत म्हणून वापरली जाते.

 

संसर्गजन्य रोगांचा उदय, वटवाघळे आणि मानवी आरोग्य

क्षयरोग (टिबी) आणि शतकानुशतके मानवाला बाधित करीत आलेला फ्ल्यू यांसारखे संसर्गजन्य रोग आपल्याला माहीत आहेत. मात्र मागील काही वर्षांत सार्स, मर्स, एचआयव्ही, इबोला, झिका आणि आता कोविड-19 यांसारख्या विषाणू संसर्गजन्य रोगांनी मनुष्याच्या जनसमूहात प्रवेश केलेला दिसून येतो. अशा अज्ञात आणि अपरिचित संसर्गजन्य रोगकारकांसाठी ‘नवीन संसर्गजन्य कारक’ अशी संज्ञा वापरतात. यांपैकी बहुतेक नवीन संसर्गजन्य रोग हे सामान्यपणे इतर प्राण्यांपासून उद्भवतात आणि लोकांमध्ये पसरतात. जेव्हा अशा रोगांचे मनुष्यामध्ये संक्रामण होते, तेव्हा कधीकधी रोगाचा उद्रेक होऊन त्याचे रूपांतर आतासारख्या महामारीमध्ये होते.विशेष म्हणजे यांसारख्या संक्रामणाच्या अनेक घटना मागील २०–३० वर्षांत घडलेल्या आहेत. असे संक्रामण का घडते आणि ते रोखण्यासाठी आपण काय करू शकतो? 

 

रोगकारकांचे नैसर्गिक आश्रयदात्याकडून किंवा स्रोतापासून मनुष्यासारख्या नवीन आश्रयीमध्ये संक्रामण होणे, ही एक असाधारण आणि दुर्मिळ घटना असते10, आणि मनुष्य आणि वन्य आश्रयी यांच्यात संपर्क वाढल्यास ती उद्भवते. साथींच्या अशा घटनांच्या परिस्थितीचा अभ्यास केला असता असे दिसून आले आहे की जेथे मानवी लोकसंख्येची घनता जास्त असते आणि सस्तन प्राण्यांमध्ये जातीसमृद्धता असते, आणि जेथे निर्वनीकरण किंवा शिकारी यांमुळे भूभागांमध्ये मानवाकडून मोठे बदल होतात, तेथे अशा घटना घडण्याचे प्रमाण अधिक असते11. जमिनीच्या अतिरिक्त वापरासाठी झालेल्या बदलांमुळे, जे मागील २०–३० वर्षे आपण जगात अनेक घटनांमधून पाहात आहोत, मानव आणि वटवाघळांसारख्या आश्रयी जातींमध्ये संपर्क वाढलेला आहे आणि म्हणूनच रोगप्रसाराच्या अशा घटना घडत आहेत.

 

खासकरून, वटवाघळे अलीकडच्या काळात बऱ्याच नवीन संसर्गजन्य रोगांशी जोडले गेले आहेत. विविध प्रकारच्या विषाणूंना आसरा देण्यासाठी ते ओळखले जाऊ लागले आहेत. त्यांपैकी बहुतांशी विषाणूंबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही आणि अनेक विषाणू मनुष्याला संक्रामित करू शकत नाहीत12. मात्र निपाह, हेंद्रा, मारबुर्ग, इबोला आणि कोरोनाविषाणू यांसारख्या नवीन आणि अलीकडे उद्भवलेल्या रोगांच्या विषाणूंचे आश्रयी म्हणून ती ओळखली जातात, ज्यामुळे तीव्र श्वास पीडा लक्षणे (सार्स-कोवी-1 आणि सार्स-कोवी-2 यांसारखे रोग) उद्भवतात. या विषाणूंचे मानवांमध्ये संक्रामण कसे होते? काही मोजक्या घटनांवरून असे मानले जात आहे की, या विषाणूंचे संक्रामण थेट वटवाघळांपासून मनुष्यामध्ये झाले आहे. उदाहरणार्थ, बांगलादेशात निपाहचा प्रादुर्भाव तेथील लोकांनी वटवाघळाच्या लाळेमुळे, मूत्राने किंवा विष्ठेने दूषित झालेली खजूराची ताडी प्राशन केल्यामुळे झाला असावा, असे मानले जाते13,14. विषाणूंचे थेट संक्रामण हे वटवाघळांबरोबर झालेल्या द्रवांच्या देवाणघेवाणीतून देखील होऊ शकते. उदाहरणार्थ, जेव्हा वटवाघळे आपल्याला चावतात (रेबीज विषाणूंचा प्रादुर्भाव होतो) किंवा आपण वटवाघळांचे मांस खातो (जसे, २००७ मध्ये कांगो देशात इबोला साथीचा उद्रेक तेथील लोकांनी वटवाघळांच्या ताज्या मांसाचे सेवन केल्यामुळे झाले असावे, असे मानतात15). रोचक गोष्ट म्हणजे फक्त मनुष्यातच नाही, तर गोरिला आणि चिंपँझी यांच्या जातींमध्येही वटवाघळांनी उष्टवलेली फळे त्यांनी खाल्ल्याने इबोलाचा संसर्ग झाल्याचे आढळले आहे14. तथापि बऱ्याचदा विषाणूंचे संक्रामण थेट वटवाघळांपासून मनुष्यामध्ये न होता, अप्रत्यक्षपणे दुसऱ्या मध्यस्थ आश्रयी प्राण्याद्वारे होते. उदाहरणार्थ सार्स, मर्स आणि कोविड-19 यांसारख्या नवीन रोगांचे संक्रामण मनुष्यात होण्याआधी रोगकारकाचा पहिल्यांदा संसर्ग ऊद मांजर (सिव्हेट कॅट), मुंगीखाऊ (पँगॉलिन) यांसारख्या आश्रयी प्राण्यांमध्ये झाला असावा, असे मानतात. 

 

वटवाघळे इतक्या विषाणूंना आश्रय देत असतील, तर ते आजारी पडतात का? आश्चर्याची गोष्ट म्हणजे तसे होत नाही! असे का घडते हे शास्त्रज्ञ समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत, आणि याचे उत्तर कदाचित त्यांच्या उडण्याच्या क्षमतेशी जोडलेले दिसते16,17,18,19. उडणे ही एक अत्यंत तणावपूर्ण क्रिया असते आणि या क्रियेत तयार झालेल्या अनेक विषारी पदार्थांमुळे पेशींमधील घटकांची हानी होऊ शकते. हे टाळण्यासाठी वटवाघळांमध्ये हळूहळू यंत्रणा अनुकूलीत झाल्या असून त्याद्वारे विषाणूंचा संसर्ग रोखणे, तसेच प्रसार टाळणे या दोन्ही बाबींवर नियंत्रण ठेवण्यात मदत होते. रोचक म्हणजे ते विषाणूंच्या संक्रामणाशी अतिरेकाने लढत नाहीत आणि अतिशय दाहक प्रतिसादांवर मर्यादा ठेवू शकतात. अशा दाहक प्रतिसादांमुळेच कोरोनाबाधित व्यक्तींमध्ये आणि बहुधा दीर्घकाळ रोगांनी त्रस्त असलेल्या रुग्णांमध्ये जीवितहानी घडून येते.दुसऱ्या शब्दांमध्ये सांगायचे तर लांब पल्ल्यासाठी उडण्याची क्षमता मिळवत असताना वटवाघळांनी विषाणूंपासून संरक्षण देणारी चांगली रोगप्रतिकारक्षमता आत्मसात केली आहे. हीच रोगप्रतिकारक्षमता त्यांचे वय मंदावते आणि त्यांना दीर्घायुष्य देते. त्यांच्या शरीराच्या आकारमानानुसार ते दीर्घकाळ जगणाऱ्या सस्तन प्राण्यांपैकी एक आहेत! तेव्हा रोगांना दूर कसे ठेवावे, हे आपण वटवाघळांकडून शिकण्यासारखे आहे.

 

सध्याच्या संकटकाळी आपण वटवाघळांची चिंता करणे योग्य आहे का?

सध्याच्या महामारीच्या काळात, मानवी परिसरातील वटवाघळांच्या अस्तित्वाविषयी आणि त्यांच्यामुळे उद्भवणाऱ्या धोक्यांविषयी लोकांच्या मनात चिंता आहे, आणि ही गोष्ट समजण्यासारखी आहे. सध्याच्या संकटकालीन परिस्थितीत हेही समजून घेणे आवश्यक आहे की, मनुष्यामध्ये कोविङ-19 रोगाचा प्रसार आपणच म्हणजे माणसेच करीत आहोत, वटवाघळे नाहीत. वस्तुस्थिती अशी आहे की अमेरिकेत संशोधकांनी वन्य वटवाघळांच्या संबंधातील सर्व संशोधन थांबवले आहे कारण वटवाघळांमुळे संसर्ग होण्याची भीती त्यांना वाटत आहे. वटवाघळांच्या वसाहती साफ करणे आणि त्यांचे निर्मूलन करण्याचा प्रयत्न करणे ही काही चांगली कल्पना नाही. कारण त्यामुळे मनुष्य आणि वटवाघळे यांच्यातील संपर्क वाढण्याची शक्यता असून इतर रोगकारकांचा संसर्ग होऊ शकतो. अशा स्थितीत वटवाघळांना कोणत्याही प्रकारे त्रास दिला, तर त्यांच्यावरील ताण वाढला जाऊन ते मोठ्या संख्येने विषाणूंचा फैलाव परिसरात करू शकतात, असे दिसून आले आहे.यावर एक चांगला पर्याय म्हणजे आपण शतकानुशतके जसे वटवाघळांसोबत एकोप्याने राहत आहोत तसेच राहणे. मनुष्य आणि वटवाघळे यांच्यातील संबंध टाळण्याकरिता काही बाबतीत सावधानता बाळगली, जसे वटवाघळांना हाताळण्याचे टाळले किंवा त्यांचे मांस खाणे टाळले, त्यांनी कुरतडलेली फळे खाणे टाळले किंवा त्यांनी फळांवर टाकलेल्या शरीरद्रवांमुळे दूषित झालेली फळे खाण्याचे टाळले, तर आपण अशा रोगांच्या साथींची शक्यता कमी करू शकतो. पुढील भविष्यकाळात, ज्या प्राण्यांपासून नवीन संसर्गजन्य रोगांचा उद्रेक होऊ शकतो अशा प्राण्यांचा संपर्क कमीत कमी होण्यासाठी आपल्या भूप्रदेशाच्या वापराचे धोरण बदलायला हवे आणि ते पूर्ववत होण्याच्या दिशेने प्रयत्न करायला हवे.यासाठी आपल्या अधिवासातील हानी रोखणे आणि नैसर्गिक अधिवासाचे तसेच जैवविविधतेचे जतन करणे आणि त्यांचा पुनर्संचय करणे, यांसाठी जगाने बांधील होणे गरजेचे आहे. अशा जगात जेथे आपल्या आजूबाजूला काही मोजकीच वटवाघळे असल्यास तेथे शेतात वाढणाऱ्या कीडींमुळे पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर होऊ शकते, डासांमुळे फैलावणाऱ्या इतर संसर्गजन्य रोगांच्या घटनांना वारंवार घडू शकतात, मोह आणि टकीला सारखी पेये नष्ट होऊ शकतात आणि जग एकूणच नीरस होऊ शकते!  

 

ऋणनिर्देश

प्रा. सत्यजित मेयर, डॉ. इयान मेंडेनहॉल, डॉ. रवी चेलम आणि कादंबरी देशपांडे यांनी दिलेले अभिप्राय, माहिती आणि सूचना यांबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.

 

संदर्भ

1. Talmale SS, Saikia U.(2018) A Checklist of Indian Bat Species. ZSI
2. Kunz, T. H., Braun, D. T. E., Bauer, D., Lobova, T., & Fleming, T. H. (2011). Ecosystem services provided by bats. Annals of the New York Academy of Sciences, 1223, 1.
3.https://bangaloremirror.indiatimes.com/bangalore/cover-story/bats-are-bengalurus-enemy-no-1-now/articleshow/75240633.cms
4.https://timesofindia.indiatimes.com/city/hyderabad/covid-19-fear-may-affect-bat-population-say-biologists/articleshow/75000386.cms
5. Roberts, B. J., Catterall, C. P., Eby, P., & Kanowski, J. (2012). Long-distance and frequent movements of the flying-fox Pteropus poliocephalus: implications for management. PLoS One, 7(8).
6. Wanger, T. C., Darras, K., Bumrungsri, S., Tscharntke, T., & Klein, A. M. (2014). Bat pest control contributes to food security in Thailand. Biological Conservation, 171, 220-223.
7. Naylor, R, & Ehrlich, PR (1997). Natural pest control services and agriculture. Nature's Services: societal dependence on natural ecosystems, 151-174.
8. IUCN SSC (2014). IUCN SSC Guidelines for Minimizing the Negative Impact to Bats
and Other Cave Organisms from Guano Harvesting. Ver. 1.0. IUCN, Gland.
9. http://www.batcon.org/
10. Plowright, R. K., Parrish, C. R., McCallum, H., Hudson, P. J., Ko, A. I., Graham, A. L., & Lloyd-Smith, J. O. (2017). Pathways to zoonotic spillover. Nature Reviews Microbiology, 15(8), 502.
11. Allen T, Murray KA, Zambrana-Torrelio C, Morse SS, Rondinini C, Di Marco M, Breit N, Olival KJ, Daszak P. Global hotspots and correlates of emerging zoonotic diseases. Nature communications. 2017 Oct 24;8(1):1-0.
12. Calisher, C. H., Childs, J. E., Field, H. E., Holmes, K. V., & Schountz, T. (2006). Bats: important reservoir hosts of emerging viruses. Clinical microbiology reviews, 19(3), 531-545.
13. Islam, M. Saiful, et al. "Nipah virus transmission from bats to humans associated with drinking traditional liquor made from date palm sap, Bangladesh, 2011–2014." Emerging infectious diseases 22.4 (2016): 664.
14. Dobson, A. P. (2005). What links bats to emerging infectious diseases?. Science, 310(5748), 628-629.
15. Leroy, E. M., Epelboin, A., Mondonge, V., Pourrut, X., Gonzalez, J. P., Muyembe-Tamfum, J. J., & Formenty, P. (2009). Human Ebola outbreak resulting from direct exposure to fruit bats in Luebo, Democratic Republic of Congo, 2007. Vector-borne and zoonotic diseases, 9(6), 723-728.
16. Brook CE, Dobson AP (2015) Bats as ‘special’ reservoirs for emerging zoonotic pathogens. Trends in microbiology. 1;23(3):172-80.
17. Banerjee, A., Baker, M. L., Kulcsar, K., Misra, V., Plowright, R., & Mossman, K. (2020). Novel insights into immune systems of bats. Frontiers in Immunology, 11, 26.
18. Ahn, Matae, et al. "Dampened NLRP3-mediated inflammation in bats and implications for a special viral reservoir host." Nature microbiology 4.5 (2019): 789-799.
19. Kacprzyk J, Hughes GM, Palsson-McDermott EM, Quinn SR, Puechmaille SJ, O'neill LA, Teeling EC (2017) A potent anti-inflammatory response in bat macrophages may be linked to extended longevity and viral tolerance. Acta chiropterologica. 30;19(2):219-28.


महेश संकरण, नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेस, टीआयएफआर, बेंगळुरू, कर्नाटक 560065
 

उमा रामकृष्णन, अशोका ट्रस्ट फॉर रिसर्च इन इकॉलॉजी ॲन्ड एन्व्हायर्न्मेंट (अट्री), रॉयल एन्क्लेव्ह, श्रीरामपूरा, जक्कूर पोस्ट, बेंगळुरू, कर्नाटक 560064
 

जगदीश कृष्णास्वामी, इकोसिस्टीम सर्व्हिसेस ग्रुप, नॅशनल मिशन ऑन बायोडायव्हर्सिटी ॲन्ड ह्युमन वेल-बिंग