संपूर्ण टाळेबंदी करून नवीन कोरोनाविषाणूला पळवून लावता येईल का?

Share


कोविड-19 रोगाच्या साथीचा प्रतिबंध करण्यासाठी संपूर्ण भारतात ४० दिवसांची राष्ट्रीय स्तरावर टाळेबंदी (लॉकडाऊन) लागू करण्यात आली, आणि त्यामुळे आपल्या जीवनातील बऱ्याच अंगांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे बदल पहायला मिळाले. अनेक शहरांमध्ये हवेचे प्रदूषण तसेच धूर कमी झाल्यामुळे आकाश स्वच्छ झाले आणि हवा ताजी झाली, आणि पंजाबच्या काही भागातील लोकांना तर सकाळी उठल्यावर त्यांच्या खिडक्यांतून यापूर्वी कधीही न दिसलेल्या हिमालयाच्या बर्फाच्छादित उंच पर्वतांचे दर्शन होऊ लागले, तर काहींना एकेकाळी गजबजलेल्या मुंबईलगतच्या समुद्रात डॉल्फिन मुक्तपणे विहार करताना दिसले.

टाळेबंदीमुळे देशातील मोठ्या भागांमध्ये, विशेषकरून, शहरी भागांमध्ये, अनेक व्यवहार बंद पडले आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी टाळेबंदी उठविण्याची प्रक्रिया टप्याटप्प्याने चालू केली आहे. काही क्षेत्रांमध्ये पुन्हा कामकाज चालू झाले असून लवकरच आपल्या सर्वांना कामावर परत रुजू होण्याची वेळ आलेली आहे. मात्र आपल्या सर्वांचे जीवन परत सामान्य स्थितीला येईल का? या घातक नवीन कोरोनाविषाणूचा मुकाबला आपल्या भारत देशाने यशस्वीपणे केला आहे का? असे प्रश्न अनेकांना पडलेले आहेत. दुर्देवाने, नवीन कोरोनाविषाणूचा (सार्स-कोवि-2) प्रादुर्भाव अजून आटोक्यात आलेला नाही. काही दंतकथांमध्ये आपण ऐकतो की बाटलीतल्या जीनला पुन्हा बाटलीत परत पाठविता येत नाही, तशीच काहीशी परिस्थिती अजूनही आहे. 

कोविड-19 रोगाची साथ आणि नवीन कोरोनाविषाणू अजून किती काळ टिकणार आहे? दुर्देवाने, या प्रश्नाचे निश्चित उत्तर अजून तरी आपल्याकडे नाही. २००२  साली चीनमध्ये झालेला सार्सचा उद्रेक हा एका प्रकारच्या कोरोनाविषाणूमुळेच उद्भवला होता; त्या कोरोनाविषाणूमुळे हजारो लोक संसर्गित झाले आणि अनेकांचा मृत्यू झाला. परंतु सार्सचा प्रसार मर्यादित होता आणि विलगीकरण तसेच अलगीकरण यांसारखे कठोर उपाय योजून त्याच्या उद्रेकावर नियंत्रण आणले गेले. आताचा सार्स-कोवि-2 हा कोरोनाविषाणू मानवजातीसाठी नवीन आहे आणि आपण त्याचे जीवविज्ञान, तसेच त्याचा प्रसार कसा होतो, हे समजून घ्यायला नुकतीच सुरुवात केलेली आहे. २००२ सालच्या कोरोनाविषाणूच्या तुलनेत, आताचा नवीन कोरोनाविषाणू अधिक संसर्गजन्य आहे आणि ज्या व्यक्तीला त्याचा संसर्ग होतो, अशा बाधित व्यक्तीच्या स्पर्शामुळे किंवा त्याच्या संपर्कामुळे या रोगाचा प्रसार वेगाने होत आहे. कोविड-19 रोगामुळे आपल्या सर्वांसमोर एक कठीण आव्हान उभे केले आहे, कारण या रोगामुळे संसर्ग झालेल्या बऱ्याच रुग्णांमध्ये रोगाची कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. यामुळे संसर्ग झालेल्या व्यक्तींना ओळखणे, त्यांना अलग करणे, तसेच त्यांच्यावर उपचार करणे कठीण बनले आहे.

मधल्या काळात, नवीन कोरोनाविषाणूसंदर्भात बरीच माहिती – काहीशी खरी आणि इतर बरीचशी अशास्त्रीय किंवा पडताळून न पाहिलेली माहिती – पसरली आहे. जसे, उष्ण आणि दमट हवामानामुळे नवीन कोरोनाविषाणूचा प्रसार कमी होतो, केवळ वृद्ध व्यक्तीलाच नवीन कोरोनाविषाणूची लागण होते, कोविड-19 रोगावर उपचार करण्यासाठी मलेरिया, एचआयव्ही (एडस्‌) या रोगांवरील औषधांचा वापर करता येतो, वगैरे. यापैकी कोणता दावा खरा आहे हे विषाणूतज्ज्ञ, साथरोगतज्ज्ञ तसेच सार्वजनिक आरोग्यतज्ज्ञ यांनी केलेल्या तर्कशुद्ध तपासणीनंतरच स्पष्ट होईलच. नवीन कोरोनाविषाणू जोपर्यंत, अगदी लहान वस्त्यांमध्ये का होईना, टिकून राहिलेला असेल, तोपर्यंत लोकांची वर्दळ पुन्हा सुरू होताच त्याचा नव्याने उद्रेक होऊ शकतो.

लंडनमधील इम्पिरियल कॉलेजच्या शीघ्र कृती गटाच्या संशोधकांनी प्रसिद्ध केलेल्या अलीकडच्या एका  अहवालात कोविड-19 रोगाच्या साथीवर मात करण्याचे दोन संभाव्य मार्ग सांगितले आहेत; एक, साथ दडपणे किंवा दोन, साथ शमविणे किंवा सौम्य करणे. पहिला मार्ग म्हणजे कोविड-19 रोगाची साथ दडपणे. याद्वारे संसर्गाचा प्रसार कमी करण्याचे प्रयत्न केले जातात म्हणजेच रुग्णांची संख्या कमीत कमी राहील, हे पाहिले जाते. भारतासह अनेक देशांनी याकरिता कठोर उपायांची अंमलबजावणी केलेली आहे. जसे, विलगीकरण, स्वयं-अलगीकरण, टाळेबंदी आणि ज्या भागात कोविड-19 बाधित रुग्ण आढळून आले आहेत असा भाग सील करणे. दुसरा मार्ग म्हणजे साथ शमविणे किंवा साथीची तीव्रता कमी करणे. यात, ज्या भागात प्रसारामुळे अधिक जणांना संसर्ग झालेला आहे अशा ठिकाणी रोगाचा प्रसार नियंत्रित ठेवून ‘समूह प्रतिक्षमता’ (हर्ड इम्युनिटी) विकसित होण्यासाठी प्रयत्न केला जातो. मात्र आपल्यासारख्या दाट लोकवस्ती असलेल्या देशात या साथीविरुद्ध वरील दोन्ही पर्यायांचा वापर करताना काही मर्यादा येत आहेत.

दीर्घकाळ टाळेबंदी ठेवण्यामुळे उद्भवणारी आव्हाने पाहता, जास्तीत जास्त लोकांना संसर्ग होण्यापासून रोखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे या कोविड-19 रोगावर प्रभावी लस निर्माण करणे. जरी नवीन कोरोनाविषाणू (सार्स-कोवि-2) हा सामान्य फ्ल्यू आणि इन्फ्लूएन्झा यांसारख्या आजारांना कारणीभूत असलेल्या कोरोनाविषाणूंच्या कुलातील असला, तरी या आजारांवर तयार केलेल्या लसींचा नवीन कोरोनाविषाणूवर कोणताही परिणाम होत नाही. जगातील शास्त्रज्ञ सद्यस्थितीत कोविड-19 रोगाची साथ पूर्णपणे आटोक्यात येण्यास मदत करेल, अशी लस शोधण्याचे प्रयत्न करीत आहेत. परंतु कोणतीही लस तयार करण्यासाठी वेळ लागतो. तज्ज्ञांचा असा अंदाज आहे की कोविड-19 रोगावर प्रभावी लस तयार करण्यासाठी, तसेच लसीच्या वैद्यकीय चाचण्या घेण्यासाठी किमान १८ महिन्यांचा काळ लागू शकतो. तोपर्यंत आपल्या स्वत:च्या हितासाठी तात्पुरते का होईना प्रवास करणे, लोकांना भेटताना गर्दी करणे यांसारख्या गोष्टी टाळायला हव्यात. म्हणूनच आपण सर्वांनी सुरक्षित राहण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रांतील व्यक्ती आणि सरकारी संस्था यांनी सुचवलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याची गरज आहे.

भविष्यात काही वर्षानंतर मागे वळून पहाताना, नवीन कोरोनाविषाणूचा (सार्स-कोवि-2) चा प्रसार रोखण्यासाठी अंमलात आणलेले कोणते उपाय प्रभावी ठरले आणि कोणते नाहीत, हे आपल्या लक्षात येईल. कदाचित तोपर्यंत कोविड-19 रोग हा कमी तीव्र झालेला असेल किंवा पुन्हापुन्हा उद्भवणाऱ्या सामान्य फ्ल्यूसारखा सौम्य असेल, मात्र जीवघेणा नसेल. परंतु आतासाठी, आणि नजीकच्या भविष्यात जोपर्यंत कोविड-19 रोगावर प्रभावी लस तयार होत नाही, तोपर्यंत आपण अत्यंत सावधपणे आणि जागरूक राहून पुढे जायला हवे.

नवीन कोरोनाविषाणूच्या संपर्कापासून आणि संसर्गापासून बचाव होण्यासाठी आपल्याला पुढील खबरदारी बाळगावी लागेल.

१. लोकांना अभिवादन करताना हस्तांदोलन करण्याचे टाळा, आलिंगन देऊ नका.

२. सार्वजनिक ठिकाणी वावरताना इतरांपासून कमीत-कमी सहा फूट शारीरिक अंतर राखा. 

३. वारंवार साबणाने हात धुवा.

४. वारंवार स्पर्श केले जाणारे किंवा वापरले जाणारे पृष्ठभाग निर्जंतुक करा (जसे लॅपटॉप, फोन, दरवाजाची मूठ अथवा दांडा, इत्यादी).

५. बऱ्याच लोकांना एकत्र भेटण्याचे प्रसंग टाळा.

६. अनावश्यक प्रवास टाळा.

७. बरे वाटत नसेल तर स्वत:ला इतरांपासून वेगळे ठेवा.     

८. स्वत:ला किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांना उच्च ताप, खोकला, घसा खवखवणे किंवा श्वास घेण्यास त्रास होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. तसेच स्वत:ची कोविड-19 चाचणी करून घ्या.

 

इप्सिता हेर्लेकर या इंटरनॅशनल सेंटर फॉर थिअरेटिकल सायन्सेस – टीआयएफआर, बंगळुरू येथे विज्ञानप्रसार कार्यक्रमाच्या समन्वयक आहेत.